Friday, January 21, 2022

बीड जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) आराखड्यात 71 कोटींची वाढ - 2022-23 सर्वसाधारणच्या आराखड्यास आता 360 कोटी मिळणार.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत विभागीय आढावा बैठकीत निर्णय.


*मागील अखर्चित निधी 100% खर्च करण्याचे कालबद्ध नियोजन करा - उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निर्देश*

*अंतर्गत रस्ते, पांदण रस्ते, ग्रामीण रुग्णालये, तीर्थक्षेत्र विकास तसेच जिल्हा परिषद इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त निधी द्या - पालकमंत्री धनंजय मुंडे*

*मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून जातीत जास्त रस्त्यांची काम पूर्ण करावीत*

बीड (जि. मा. का.) ----- : बीड जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणच्या सन 2022-23 च्या 288.68 कोटी रुपयांच्या आराखड्यात तब्बल 71 कोटी 31 लाख 50 हजार रुपयांची वाढ करत ही रक्कम 360 कोटी रुपये इतकी वाढविण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांनी केली आहे. 

मुंबई येथे मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्हा वार्षिक योजनेच्या विभागीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस पालकमंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते. तर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. 

यावेळी सर्वसाधारण च्या 288.68 कोटींच्या आराखड्यात वाढ करून दिली जावी अशी, आग्रही मागणी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केली असता त्यास सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सर्वसाधारणच्या आराखड्यास 288.68 कोटींवरून वाढवत 360 कोटी देण्यास तात्काळ मान्यता दिली.

दरम्यान मागील वर्षी जिल्हा नियोजन समितीस देण्यात आलेल्या 340 कोटी रुपयांपैकी अखर्चित असलेल्या निधीचे 100% खर्च करण्याचे नियोजन 15 फेब्रुवारीच्या आत करण्यात यावे, अशा सूचनाही यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी जिल्हा प्रशासनास दिले. मागील वर्षीच्या सर्वसाधारण योजनांसाठी 340 कोटी रुपये नियतव्यय मंजूर होता, त्या तुलनेत यावर्षी 20 कोटींची वाढ जिल्ह्याला मिळाली आहे. 

दरम्यान बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले रस्ते, पूल यांसह अन्य सार्वजनिक मालमत्ता दुरुस्तीसाठी बीड जिल्ह्यास अतिरिक्त निधी देण्यात यावा, मातोश्री पांदण रस्त्यांच्या योजनेस मान्यता, जिल्ह्यातील श्री क्षेत्र नारायणगड, श्री क्षेत्र गहिणींनाथगड तसेच पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र भगवानगड व परळी वैद्यनाथ देवस्थान व जिल्ह्यातील अन्य महत्वाच्या तीर्थ स्थळांच्या विकास आराखड्यास अर्थ व नियोजन विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्यात यावा, या मागणीकडे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी लक्ष वेधले असता, या सर्व विषयांसाठी अर्थसंकल्पात विशेष निधीची तरतूद करण्यात येईल अशी ग्वाही श्री. पवार यांनी दिली.

बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या रस्त्यांची दुरुस्तीची शक्य असलेली सर्व कामे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून केले जावेत, तसेच याव्यतिरिक्त निधीची मागणी नियोजन विभागास सादर करावी असेही श्री. पवार पुढे बोलताना म्हणाले. 

कोविड काळात बीड जिल्ह्यात उपाययोजना व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला. जिल्ह्यात आणखी आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी आणखी निधीची गरज असल्याचे धनंजय मुंडे यांनी यावेळी अधोरेखित केले.

माजलगाव व आष्टी येथे उपजिल्हा रुग्णालय उभारण्यास तसेच जिल्ह्यातील अन्य आवश्यक असलेल्या ग्रामीण रुग्णालयांची दुरुस्ती व नाविनिकरण करण्यासाठी आरोग्य विभागाकडून स्वतंत्र तरतूद करून देण्यात येईल, असेही अजितदादा पवार यांनी म्हटले आहे.

धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या बीड शहरातून जाणाऱ्या बायपास ते बायपास या 12 किमी अंतराच्या रस्त्याची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मार्फत दुरुस्ती करण्यात येत आहे, मात्र यातील इलेक्ट्रिक पोल शिफ्टिंग व ड्रेनेज साठी निधीची तरतूद नाही, ही तरतूद जिल्हा नियोजन समितीने करावी अशी मागणी आ. संदीप क्षीरसागर यांनी केली असता, पालकमंत्री धनंजय मुंडे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यास तात्काळ मान्यता दिली, त्यामुळे बीड शहरातून जाणारा बायपास ते बायपास रस्ता सुसज्ज होणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस ना. धनंजय मुंडे यांच्या सह, व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आ. संदीप भैय्या क्षीरसागर, आ. संजय भाऊ दौंड, जिल्हाधिकारी श्री. राधाबिनोद शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अजित पवार, पोलीस अधीक्षक श्री. आर. राजा, जिल्हा नियोजन अधिकारी राधाकृष्ण ईघारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांसह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

*जिल्हा परिषद इमारतीसाठी व पंचायत समित्यांच्या फर्निचरसाठी निधी उपलब्ध करणार -.उपमुख्यमंत्री अजित पवार*

बीड जिल्हा परिषदेच्या नवीन इमारती चे काम पूर्ण करण्यासाठी किती निधी हवा आहे याबाबतचा प्रस्ताव तातडीने पाठवा, तसेच बीड जिल्ह्यातील पंचायत समितींना फर्निचर साठी लागणाऱ्या प्रति पंचायत समिती सुमारे दीड कोटी निधी मागणीचा प्रस्ताव तातडीने पाठवण्याची सूचना अजित दादा पवार यांनी या बैठकीत केली. इतकेच नव्हे तर बीड जिल्हा परिषद, बीड जिल्हाधिकारी कार्यालयाला सुसज्ज इमारत आहे का, ही इमारत कधी बांधलेली आहे, नव्याने इमारत बांधण्याची आवश्यकता आहे का? याबाबतची ही त्यांनी चौकशी केली.

*कंकालेश्वर मंदिराची धनंजय मुंडे यांनी दिली माहिती*

जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा हे बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून ऑनलाईन बैठकीसाठी बसले होते. त्यांच्या पाठीमागे कंकालेश्वर मंदिराचा फोटो स्क्रीनवर दिसत होता, हे मंदिर नेमके कशाचे असा प्रश्न अजितदादांनी विचारला असता, धनंजय मुंडे यांनी अजितदादा पवार यांना बीड शहरातील कंकालेश्वर या प्राचीन मंदिराची माहिती अवगत करून दिली.

बैठकीत सुरुवातीला जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी जिल्हा नियोजन समितीच्या वतीने आराखड्याचे उपमुख्यमंत्री श्री पवार यांना ऑनलाइन सादरीकरण केले.

जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा कार्यालयांच्या इमारतींबाबत यावेळी आढावा घेण्यात आला.  यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी माहिती दिली .
0000

No comments:

Post a Comment