
गेवराई : (प्रतिनिधी) गेवराई शहरात चोरट्यांचा धुडगूस सुरुच असून शुक्रवारी रात्री येथील कोल्हेर रोडवरील जिल्हा मध्यवर्ती बँकेत चोरट्यांनी कँबीनसह संगणकाची तोडफोड केली. तसेच शेजारील किराणा, कपडे दुकानाचे गोडाऊनसह इतर दोन दुकाने फोडली. यामध्ये लाखाहून अधिक रुपयांचा ऐवज चोरी गेला असल्याचे सांगितले जाते.
गेवराई शहराला मागील काही दिवसांपासून चोरट्यांनी लक्ष केल्याचे वारंवार होणाऱ्या घटनांमुळे सिध्द होत आहे. गोरगरीबांचे पशुधनसह दुचाकी, चार चाकी वाहने चोरट्यांनी लंपास केली आहेत. तसेच चार दिवसांपूर्वीच ताकडगाव रोडवरील पाच दुकाने व एका जणाचे घर चोरट्यांनी फोडून लाखोंचा ऐवज लंपास केला होता. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असताना व पाठीमागील घटनेचा शोध पोलिसांना लागलेला नसताना पुन्हा शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कोल्हेर रोडवर धुडगूस घातला. या रोडवरील असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत चोरट्यांनी शटरचे लाँक तोडून आत प्रवेश केला. मात्र आतमध्ये कँश न मिळाल्याने चोरट्यांनी कँबीनसह संगणकाची तोडफोड केली. यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा बँकेशेजारील किराणा दुकान, कपडे दुकानाचे गोडाऊन व इतर दोकानाकडे वळवून कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करत रोख रक्कमसह इतर साहित्य असा मिळून लाखाहून अधिक रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केला. सकाळी नागरिक उठल्यानंतर हा प्रकार लक्षात येताच पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला आहे. दरम्यान गेवराई शहरात मागील काही दिवसांपासून सातत्याने चोरीच्या घटना होत असताना पोलिस नेमके करतात काय ? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
No comments:
Post a Comment