Tuesday, July 18, 2023

रेल्वे रुळांवर आलेल्‍या ५० मेंढ्यांचा मृत्यू.मेंढपाळांचे आठ लाखाचे नुकसान.

परभणी (प्रतिनिधी) : परभणी तालुक्यातील मिरखेल ते पिंगळी दरम्यान रेल्‍वे ट्रॅकवर मेंढ्या आल्‍या. याच दरम्‍यान रेल्‍वे आल्‍याने रेल्वेखाली ५० मेंढ्यांचा मृत्यू झाला. पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली असून मेंढपाळांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. 
परभणी तालुक्यातील तट्टू– जवळा येथील तुकाराम गलांडे व पिंगळी येथील बाळासाहेब भुमरे हे मेंढपाळाचा व्यवसाय करतात. रात्री शेतामध्ये मेंढ्यांचा कळप बसवला होता. परंतु, मध्यरात्रीच्‍या सुमारास या मेंढ्यांपैकी जवळपास ५० मेंढ्या या फिरत फिरत रेल्वे रुळांवर गेल्या. पहाटे साडेतीनच्या सुमारास पिंगळी ते मिरखेल दरम्यान धावणाऱ्या रेल्वेखाली या मेंढ्या आल्याने त्यांचा मृत्यू झाला.

मेंढपाळांचे आठ लाखाचे नुकसान

सकाळी मेंढपाळ जेव्हा या मेंढ्यांचा शोध घेत होते. तेव्हा त्यांना या मृतावस्थेत असलेल्या मेंढ्या रेल्वे रुळांच्या दोन्ही बाजूने आढळून आल्या. या दोन्ही मेंढपाळांचे जवळपास सात ते आठ लाखाचे नुकसान झाले असून परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने तात्काळ पंचनामा करून मदत करावी, अशीच अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment