Wednesday, July 12, 2023

तृतीयपंथी मुस्कान व नारायण चा विवाह थाटामाटात संपन्न. जिल्ह्यातील दुसरा तृतीयपंथी विवाह उत्साहात समाजाने स्वीकारला.


*बीड येथे आश्रय सेवा केंद्राच्या वतीने करण्यात आला सत्कार

बीड (प्रतिनिधी) - तृतीयपंथीयांबाबत समाजात विविध मतप्रवाह असतांना बीडमधील एका तरुणाने तृतीयपंथीयाशी विवाह केला. मुळ घनसावंगी तालुक्यातील असलेल्या या तरुणाने बीड येथील मुस्कान शेख अलीया बक्ष या तृतीयपंथीयाशी येरमाळा येथे विवाह केला. आता बीडमध्येच राहुन संसार थाटणार असल्याचे या तरुणाने सांगितले.
घनसावंगी येथील नारायण हा तरुण बीड व नगर जिल्ह्याच्या सिमेवर असलेल्या जातेगाव येथे मिनी बँकेत कार्यरत आहे. या दरम्यान त्याची ओळख बीड येथील तृतीय पंथी मुस्कान शेख अलीया बक्ष यांच्याशी झाली. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नारायण व मुस्कान यांचा विवाह सोहळा येरमाळा येथे काही मित्र व नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडला. आता हे दोघेही बीड येथेच वास्तव्यास राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

*बीडमधील दुसरा विवाह

वर्षभरापूर्वी बीड येथीलच तृतीयपंथी सपना आणि बाळू यांचा विवाह सोहळा पार पडला होता. ते दोघेही बीडमध्येच राहतात. आता त्यांच्या पाठोपाठ नारायण व मुस्कान यांचा विवाह सोहळा पार पडला. या विवाहाकरिता बीड येथील आश्रय सेवा केंद्र या तृतीयपंथीयांसाठी काम करणार्‍या संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी पुढाकार घेतला. या संस्थेच्या माध्यमातून राज्यभरातील तृतीय पंथीयांकरिता विविध उपक्रम राबविले जातात. आता मुस्कान व नारायण यांच्या भावी वाटचालीसाठी शासनाकडून काही मदत मिळते का, याबाबत पाठपुरावा केला जात आहे.

No comments:

Post a Comment