Wednesday, July 26, 2023

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे नवं संकट सोयाबीनवर शंखी गोगलगाय तर कापसा वर ढब्बू पैशाची कीड.


बीड (कांतीकारी साथी न्यूज रिपोर्ट)   तिबार पेरणीचं संकट घोंगावणाऱ्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे आता नवं संकट उभा ठाकलाय. सोयाबीनवर शंखी गोगलगाय तर कापसावर ढब्बू पैशाची कीड लागल्याने उभी पिकं नेस्तनाबूत होत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागांमध्ये पावसानं हाहाकार घातला आहे. या पावसामुळं मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालं आहे. तर तिकडे बीड जिल्ह्यामध्ये मात्र जुलै महिना संपत आला तरी पुरेसा पाऊस झालेला नाही. काही ठिकाणी पेरण्या झाल्या असल्या तरी उगवून आलेलं सोयाबीन आणि कापसावर मोठ्या प्रमाणात गोगलगाय आणि ढब्बूपैसा किडीचा प्रादुर्भाव झाल्यानं पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसमोर एक नव संकट उभा राहिलं आहे.

बीडच्या परळी, केज, अंबाजोगाई बीड धारूर तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या शेतात गोगलगायचा सडा पडला आहे. उगवूण आलेलं पीक मोठं होण्याच्या आतच गोगलगाय फस्त करून टाकत आहेत. त्यामुळं दररोज सकाळी शेतकऱ्यांना शेतामध्ये गोगलगाय वेचून काढाव्या लागत आहेत. तर गेल्या वर्षी देखील याच गोगलगायीमुळं अंबाजोगाई, परळी, केज तालुक्यातील शेकडो हेक्टरवरील कापूस आणि सोयाबीन पीक पूर्णपणे वाया गेलं होतं.

बीडच्या परळी तालुक्यात असणाऱ्या वाघबेट, बेलांबा गावासह परिसरातील अनेक गावांमध्ये पिकांवर गोगलगाईचा प्रादुर्भाव झाला आहे. अगोदरचं अस्मानी संकटात शेतकरी उध्वस्त झालाय. त्यात गोगलगायचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. पीकविमा नाही, अतिवृष्टीचे अनुदान नाही. त्यामुळं आता पेरणी करायची तर कुठून करावी ? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. त्यामुळं मायबाप सरकारने मदत द्यावी अशी मागणी शेतकाऱ्यांमधून होत आहे.

तर दुसरीकडे धारूरच्या फकीर जवळा परिसरातील सोयाबीन व कापूस पिकावरील ढबु पैशा ह्या किडीमुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. ढबु पैशाचा प्रादुर्भाव वाढला असल्याने सोयाबीन, कापूस पिके धोक्यात आली आहेत. 

एक तर सुरुवातीला दीड महिना पावसाने दडी मारली त्यात कशिबशी पेरणी झाली. कमी जास्त प्रमाणात पाऊस पडत असल्याने कापूस व सोयाबीनची प्रचंड तुटाळ होत आहे. ही तुटाळ भरून काढत असतानाच ढबू पैशाच्या आक्रमणाने शेतकरी चांगलाच वैतागला आहे.त्यामुळं कृषी विभागाने याची पहाणी करून मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

विशेष म्हणजे या आसमानी संकटाच्या खाईत होरपळलेला बीड जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याकडे वळत आहे. गेल्या सहा महिन्यात बीड जिल्ह्यात तब्बल 146 शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

दरम्यान एकीकडे ओला दुष्काळ पडत असताना दुसरीकडे मात्र बीड जिल्ह्यातील शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटाच्या खाईत होरपळला जात आहे. मात्र लोकप्रतिनिधी आपली सत्ता टिकवण्यासाठी जोर लावत आहेत. त्यामुळे जर आपली सत्ता टिकवून झालं असेल तर या अस्मानी आणि सुलतानीच्या संकटाच्या खाईत अडकलेल्या शेतकऱ्यांना हे सरकार आधार देणार का ? हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

No comments:

Post a Comment