Tuesday, July 4, 2023

धनंजय मुंडे यांना राज्यात मंत्रिपद, पंकजा मुंडेंचा पत्ता कट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.

मुंबई (प्रतिनिधी): अजित पवारांच्या सरकारला पाठिंबा दिल्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण हादरुन गेलं. अजित पवार यांच्यासहित राष्ट्रवादीचे बडे नेते शिंदे सरकारमध्ये सामील झाले. या शपथविधीनंतर अनेक नेत्यांची झोपच उडाली आहे. याचदरम्यान, धनंजय मुंडे यांना राज्यात मंत्रिपद मिळालं आहे, तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांना राज्य सरकारमध्ये स्थान न दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. आताच्या सत्तानाट्यामुळे पंकजा मुंडे नेमकी काय भूमिका घेतात,याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी अजित पवार गटाच्या अध्यक्षतेखाली मंत्रिपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार अशा तीन नेत्यांची महायुती झाली आहे. पुढील निवडणूकही एकत्रित लढणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना येत्या निवडणुकीतही बीडमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता बळावली आहे.

आगामी विधानसभेच्या निवडणुकीत बीडमधील जागा कुण्याच्या वाट्याला येईल. पंकजा मुंडे की धनंजय मुंडे हा पेच आहे. 2019 च्या निवडणुकीत पंकजा मुंडेंना डावललं गेलं. तेव्हापासूनच त्यांचा नाराजीचा सुरू अजुनही कायम आहे. पण आता धनंजय मुंडे यांच्या वाढत्या वर्चस्वामुळे मुंडे भावा-बहिणीत पुन्हा पेच उभा राहण्याची शक्यता असल्याचं जाणकार सांगतात.

काकांनी डावल्यानं अजित पवारांनी बंड केलं, असं बोललं जातंय. असंच काहीसं मोठ्या काळापासून पंकजा मुंडेंसोबत सुरू असल्याची कुजबूज ऐकायला मिळते. त्यामुळे पंकजा मुंडे काही वेगळी भुमिका घेणार का? यावरुन तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे यांना बीआरएस आणि एमआयएम पक्षाकडून खुल्या ऑफर्सही देण्यात आल्या आहेत.

अजित पवारांच्या बंडामुळे परळीच्या जागेचा मुद्दा चर्चेत आला आहे. पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळणार की नाही? धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर पंकजा मुंडे यांचं राज्यातलं भवितव्य कसं असणार? बीडच्या राजकारणासाठी 2024ची निवडणूक नेमका कोणता अर्थ सांगणार? प्रश्न अनेक आहेत. पण त्याची उत्तर शोधण्यासाठी बीडमधील जनतेत चर्चांना उधाण आलं आहे.

No comments:

Post a Comment