परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : वडखेल येथील हटकर समाजाच्या स्मशानभूमीवर अतिक्रमण केल्यामुळे शेतावर प्रेत जाळावं लागल्याचे दखल घेत परळी तहसिलदार सुरेश शेजूळ यांनी अतिक्रमण करणारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. आता गटविकास अधिकारी संबंधित अतिक्रमण कराणारावर कधी गुन्हा दाखल करणार याकडे वडखेल ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
वडखेल येथील स्मशानभूमीवर अतिक्रमण केल्यामुळे शेतावर प्रेत जाळण्याची वेळ गावक-यांवर आली आहे. याबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने परळी तहसिलदार यांच्या कडे तक्रार दाखल करण्यात आली होती. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच तहसिलदार यांनी गटविकास अधिकारी यांना संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. गटविकास अधिकारी यांच्या आदेशावरून तलाठी दिगंबर साबने आणि ग्रामसेवक ताटे यांनी वडखेल येथे जाऊन पाहणी केली असता याच जोडगोळीने जे अतिक्रमण हटविले होते, तेथे पुन्हा अतिक्रमण झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. येथे लावण्यात आलेली झाडेही तोडण्यात आलेली आहेत. ग्रामपंचायतीने स्मशानभूमीच्या बांधकामासाठी खोदलेला पायाही बुजवून टाकल्याचे तलाठी आणि ग्रामसेवकाच्या निदर्शनास आले आहे. एवढे सर्व निदर्शनास आल्यानंतर आता गटविकास अधिकारी संबंधित गाव गुंडावर कधी गुन्हा दाखल करणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.

No comments:
Post a Comment