*लहानग्यांमध्येही प्रभू श्रीरामांविषयीची आस्था व आकर्षण अधोरेखित*
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) श्रीराम जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला परळीतील सुर्वेश्वरनगर परिसरात एक आगळीवेगळी झलक पाहायला मिळाली. येथील रहिवासी सचिन पाचनकर यांचा तीन वर्षाचा चिमुकला मुलगा शिवांश पाचनकर याने प्रभू श्रीरामाची वेशभूषा साकारून उपस्थितांचे मन जिंकले. त्याच्या या भक्तिरसात न्हालेल्या रूपाने नागरिकांमध्ये आनंद, श्रद्धा आणि कौतुकाचे वातावरण निर्माण झाले.
आजच्या युगात लहान वयातच मोबाइल, गेम्स याकडे मुलांचा कल असताना शिवांशसारख्या मुलांनी आपल्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेत रस घेणे हे निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे. शिवांश याने याआधी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ मासाहेब, तसेच भगवान शंकर यांची वेशभूषा साकारली असून, त्यामुळे तो परिसरात लहान वयातच एक संस्कारशील, गुणी मुलगा म्हणून ओळखला जात आहे.
शिवांशच्या या सादरीकरणाने एक गोष्ट अधोरेखित केली – की आजही लहान मुलांमध्ये प्रभू श्रीरामांविषयीची क्रेझ आणि भक्ती कायम आहे. त्याचे वडील सचिन पाचनकर आणि संपूर्ण कुटुंब यामागे सतत प्रोत्साहन देत असल्यानेच शिवांशच्या प्रतिभेला अशी सुंदर दिशा मिळत आहे. श्रीराम जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवांशचा श्रीराम गणवेश सणाच्या उत्साहात एक वेगळीच भक्तीमय रंगत भरून गेला. या चिमुकल्या रामाच्या रूपाने संपूर्ण परिसरात भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले आणि अनेकांचे डोळे आनंदाने पाणावले. शिवांश सचिन पाचनकर याचा हा उपक्रम खरंच कौतुकास्पद असून, अशा बालगोपाळांच्या माध्यमातूनच समाजात संस्कार, श्रद्धा आणि परंपरेचे मूल्य जपले जात आहे.
No comments:
Post a Comment