Saturday, February 25, 2023

औरंगाबाद : नाव बदललं तरी उल्लेख 'औरंगाबादच' करावा लागेल; तांत्रिक बाजू समजून घ्या !

मुंबई (प्रतिनिधी):औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नावावर आता अनुक्रमे छत्रपती संभाजी नगर आणि धाराशीव असं अखेर शिक्कामोर्तब झालं. पण असं असलं तरी नव्या नावाचा उल्लेख मर्यादित स्वरुपात करता येणार आहे. त्याला कारणीभूत आहे केंद्राचं ना हरकत पत्र. या पत्रात नक्की काय म्हटलंय पाहुयात.
केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाकडून यासंदर्भात ना हरकत पत्र जाहीर करण्यात आलं आहे. हे अधिकृत पत्र सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव जे. जे वाळवी यांच्या नावानं लिहिण्यात आलं आहे. यामध्ये म्हटलं की, "तुम्ही २० ऑक्टोबर २०२२ रोजी भारत सरकारकडं पाठवलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद शहराचं नाव 'छत्रपती संभाजी नगर' असं करण्यात यावं. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद शहराचं नाव 'धाराशीव' असं करण्यात यावं. या मागणी पत्राला अनुसरुन या शहरांच्या नावात बदल करण्यास आमची कुठलीही हरकत नाही"
वरील पत्रातील मजकुरानुसार हे स्पष्ट होतं आहे की, नामांतराचा निर्णय हा केवळ औरंगाबाद जिल्ह्याच्या मुख्यालयाचं शहर असलेल्या औरंगाबादच्या नावतच 'छत्रपती संभाजीनगर' असा बदल करण्यात आला आहे. तसेच उस्मानाबादच्या मुख्यालयाचं शहर असलेल्या शहराचं नामांतर 'धाराशीव' करण्यात आलं आहे. पण औरंगाबाद जिल्ह्याला औरंगाबाद असंच संबोधलं जाईल, त्याचप्रमाणं उस्मानाबाद जिल्ह्याला उस्मानाबाद असंच संबोधलं जाणार आहे. त्यामुळं या आदेशातील ही तांत्रिक बाब समजून घेणं गरजेचं आहे.

No comments:

Post a Comment