Friday, February 17, 2023

मोर्चा काढू नका म्हणून सीईओ 'अजित पवार' यांचा दबाव ! राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा गंभीर आरोप.

बीड (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यात जलजीवन योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरकारभार आणि अनियमित्ता सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. तसेच राष्ट्रवादीने आज जिल्हा प्रशासन आणि आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या विरोधात मोर्चा काढला. मात्र हा मोर्चा काढू नका म्हणून सीईओ अजित पवार यांच्यासह अधिकाऱ्यांनी माझ्यासह कुटुंबावर दबाव टाकला, असा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा बांगर यांनी केला आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा बांगर म्हणाले की, बीड जिल्ह्यात जलजीवन योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरकारभाराच्या तक्रारी समोर येत आहेत. या जलजीवन योजनेला व्यवस्थित सुरुवातही झाली नसताना कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले गेले आहेत. असेच प्रकार घडत राहिले तर बीड जिल्ह्याची दुष्काळी जिल्हा ही ओळख कायम राहील.

बाळा बांगर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार हे नियम डावलून अनेकांना बोगस पद्धतीने काम वाटप करत असून या योजनेतून कोट्यावधी रुपयांचा अपहार होण्याचे प्रकार समोर येत असल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान सीईओ अजित पवार यांनीच मोर्चा काढू नका म्हणून दबाव टाकल्याचा आरोप राष्ट्रवादी व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा बांगर केल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे.

बीडमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा बांगर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर जल धडक मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा शहरातील राष्ट्रवादी भवनपासून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नगर रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

No comments:

Post a Comment