वर्षामागून वर्ष सरत गेली, आणि पाहता पाहता आमचे मार्गदर्शक तथा मराठवाडा साथीचे मुख्य संपादक मोहनलालजी बियाणी यांच्या निधनाला चार वर्ष झाली.वास्तविक पाहता मराठवाडा साथीच्या कार्यालयात काम करीत असताना त्यांची सातत्याने उणीव भासते. परंतू ते आमच्या आसपासच आहेत, एखाद्या बातमीबद्दल मत किंवा घटनेबाबत ते प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत असा भास झाल्याशिवाय राहत नाही. काकाजींची स्मृती ही आमच्या सर्वांसाठी एक प्रेरणा असून आज त्यांना चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त आदरांजली अर्पण करीत असतांना त्यांचा एकुण पत्रकारितेचा प्रवास समोर आल्याशिवाय राहत नाही.
वृत्तपत्र काढणे सोपे असते परंतु त्यात सातत्यपुर्णता ठेवण्यासोबत वृत्तपत्र वाचकाभिमूख असणे तेवढेच महत्वाचे आहे. हल्ली दररोजच वेगवेगळी वर्तमानपत्रे प्रकाशित होतांना दिसत असतात, त्यातील बातम्या आणि साहित्य यावरही चर्चा होतांना दिसते. दै. मराठवाडा साथीचे मुख्य संपादक स्व. मोहनलालजी बियाणी यांनी मात्र अत्यंत प्रतिकुल परिस्थितीचा सामना करीत असतांना केवळ वृत्तपत्र चालविले नाही तर अनेक पत्रकारसुद्धा त्यांनी घडविले आहेत. मराठवाडा साथीचे वर्णन करतांना आमच्यासारख्या अनेक पत्रकारांना घडविणारे काकाजी हे खर्या अर्थाने पत्रकारितेचे चालते-बोलते विद्यापीठच म्हणावे लागेल.
साधारणपणे 30 वर्षाखाली वृत्तपत्रे ट्रेडल प्रेसवर तयार केली जात होती. एक-एक अक्षर गोळा करायचे, त्याच्या ओळी करुन बातमी तयार करायची आणि ट्रेडलवर घड्या मारुन प्रिन्ट करायचे असे वृत्तपत्र छपाईचे स्वरुप होते. काकाजींनी त्या काळात सुरु केलेली पत्रकारिता आज नव्या वळणावर जात असतांना यामागे घेतलेले त्यांचे कष्ट समोर येते. एखादा मनुष्य किती जगला यापेक्षा तो कसा जगला याला मोठे महत्व असते. काकाजींनी आपल्या जीवनात अनेक पत्रकार घडविले असून आज ही मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतांना दिसून येतात.
बातमी कशी असावी यापासून वृत्तपत्र बातमीचे स्थान कोठे आणि किती असावे याबाबत काकाजी नेहमीच मार्गदर्शन करतांना दिसून आले आहेत. मी सुमारे 21 वर्षापासून मराठवाडा साथीत कार्यरत असून काकाजींच्या माध्यमातून घडलेल्या पत्रकारांची यादीच समोर येते.
मुंबईच्या प्रहारमध्ये कार्यरत असलेले व आपल्या समाज प्रबोधन कीर्तनाने समोर आलेले ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर, माहिती कार्यालयात कार्यरत असलेले शाम टरके, गोव्याच्या पुढारीमध्ये सेवा केलेले बाबा देशमाने यांच्यासोबतच लक्ष्मण वाकडे, ज्ञानोबा सुरवसे, ना.धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी, माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रदीप कुलकर्णी, चंद्रशेखर फुटके, धनंजय आढाव, बालासाहेब कडबाने, सुधीर गोस्वामी अशी किती तरी नावे घेता येतील. आम्ही सर्व मंडळी काकाजी नावाच्या चालत्या-बोलत्या पत्रकारितेच्या विद्यापीठात शिकलेलो आहोत याचा मनापासून आनंद वाटतो.
निवडणूका म्हटलं की, आरोप-प्रत्यारोप होत असतात. अशावेळी बातमी प्रसिद्ध करतांना काय खबरदारी घ्यावी याबाबत केलेल्या सूचना अजूनही आठवतात. नेतेमंडळी म्हणजेच लोकप्रतिनिधी आपल्या भाषणात आरोप करीत असतात परंतु आरोपाची उंची तपासून कोणाचीही प्रतिष्ठा लयास जाणार नाही अशा पद्धतीने निवडणूकींच्या बातम्या प्रसिद्ध करण्याचे ते सांगत. परळी आणि बीड जिल्ह्यात नेहमीच राजकारण महत्वाचे ठरलेले आहे. या पार्श्वभूमीवर राजकारणांच्या बातम्यांपेक्षा विकासाच्या बातम्यांवर भर देत रहा...असे ते नेहमीच सांगत. परळी-बीड-अहमदनगर रेल्वेमार्गासंदर्भात रेल्वे समिती म्हणून त्यांनी तर काम केलेच आहे परंतु आपल्या बातमीतून या मार्गाची गरज जनतेसमोर ठेवण्याचे ते सांगत होते. अगदी गल्लीपासून थेट देशाची राजधानी दिल्लीपर्यंत हा मार्ग किती महत्वाचा आहे, त्याला निधी कसा मिळेल या बाबत लिहीत जा अशी सूचना ते नेहमीच करीत होते. मराठवाड्यातील औरंगाबाद नंतरचे सर्वात मोठे शासकीय रुग्णालय अंबाजोगाई येथे असून तेथे रिक्त जागा, उपचारासाठी आवश्यक असलेली यंत्रसामुग्री, विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले हॉस्टेल्स् या प्रश्नांवर विशेष बातमी करण्याबाबत ते नेहमीच आग्रही असतात. परळी शहराचा विकास कसा होईल हा केंद्रबिंदू समोर ठेवून अनेक प्रश्नांवर किंबहूना विषयांवर काकाजींनी आम्हाला लिहीते केले आहे. बातमीदारी केवळ आपल्याला नाव कमाऊन देते असे नाही तर आपल्या गावाच्या प्रश्नांबाबत लिहील्यानंतर चांगल्या विषयांवर चर्चा होते असा सल्ला ते नेहमीच देतात. म्हणूनच आजही आम्हाला स्व. मोहनलालजी बियाणी चालते-बोलते विद्यापीठ वाटतात. आज त्यांना स्मृतीदिनी भावपूर्ण आदरांजली.
*प्रशांत प्र.जोशी*
जेष्ठ पत्रकार
मो.9822629833
No comments:
Post a Comment