Saturday, February 13, 2021

फौजदार चांदणे हर्सूल कारागृहात रवाना. रात्रपाळीची ड्युटी न बदलण्यासाठी महिनेवारी लाच मागणे पडले महागात.




 औरंगाबाद- (प्रतिनीधी ) रात्रपाळीची ड्युटी न बदलण्यासाठी दोन हवालदारांना दरमहा 6 रुपयांची लाच मागणा-या शहर पोलीस मुख्यालयातील लाचखोर फौजदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ( Anti Corruption Bureau)शुक्रवारी (दि. 11) अटक केली. न्यायालयाने त्याची रवानगी हर्सुल कारागृहात केली आहे

राजकुमार उत्तमराव चांदणे (57) अटक केलेल्या आरोपी फौजदाराचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार दोन्ही हवालदार हे पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. तर राखीव पोलीस उपनिरीक्षक म्हणून आरोपी चांदणे तेथे कार्यरत आहे. आरोपीने त्यांच्या ड्युटी रात्रपाळीवरुन दिवस पाळी अशी केली. तक्रारदार यांना रात्रपाळीची ड्युटी हवी असल्यामुळे त्यांनी आरोपी चांदणे यांच्याकडे विनंती केली असता त्याने मनासारखे काम हवे असेल तर प्रत्येकी तीन हजार यानुसार दोघांचे 6 हजार दर महिन्याला द्यावे लागतील, असे सांगितले. यामुळे त्या दोन्ही हवालदारांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आरोपी चांदणेची तक्रार केली.

8 डिसेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधकचे उप अधीक्षक रुपचंद वाघमारे आणि कर्मचाऱ्यानी लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता आरोपीने लाच मागितल्याचे सिध्द झाले. एसीबीकडे आपली तक्रार झाल्याचा संशय आरोपी चांदणेला आल्याने त्याने लाचेची रक्कम घेतली नाही. दरम्यान तो रजेवर गेला होता. लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे शुक्रवारी याप्रकरणी आरोपीविरुध्द बेगमपुरा ठाण्यात गुन्हा दाखल केला. या नंतर एसीबीच्या पोलिसांनी शुक्रवारी दुपारी उपनिरीक्षक चांदणे याला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चांदणे ची रवानगी हर्सुल कारागृहात केली.

* निवृतीला उरले होते अवघे काही दिवस.

आरोपी फौजदार चांदणे हा सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर होता. त्याने वयाची 57 वर्ष काही महिने ओलांडली होती. राखीव निरीक्षक यांची बदली झाल्यामुळे चांदणेकडे पोलीस निरीक्षकपदाचा पदभार होता. यातच त्याने कर्मचाऱ्यांकडुन वसूली सुरू केल्याची चर्चा सुरू होती. दरम्यान एसीबीला तक्रार प्राप्त झाल्यामुळे चांदणे आज पकडला गेला आहे.

No comments:

Post a Comment