Thursday, February 11, 2021

घोटाळे बहाद्दर बीड जिल्हा बँकेची ईडी मार्फत चौकशी चालू. बँकेच्या वर्तुळात खळबळ.- अँड.अजित देशमुख

बीड ( प्रतिनिधी ) बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, बीड मध्ये शेकडो कोटींचे कर्ज बेकायदेशीर रीतीने वाटप करण्यात आले. अस्तित्वात नसलेल्या संस्थांना देखील कर्ज देण्यात आले. त्यामुळे त्यावेळी सव्वाशेच्या वर गुन्ह्यांमध्ये जवळपास दोन हजार लोकांना आरोपी करण्यात आले. आता या सर्व प्रकाराची चौकशी डायरोकटरेट ऑफ इंटफोर्समेंट, नागपूर ( भारत सरकारचे प्रवर्तन निदेशालय, वित्त मंत्रालय राजस्व विभाग, नागपूर अर्थात ईडी ) यांनी चालू केली आहे. त्यामुळे बँकेच्या वर्तुळात खळबळ माजली असल्याची माहिती याबाबत सातत्याने पाठपुरावा करणारे जन आंदोलनाचे विश्वस्त ॲड. अजित एम. देशमुख यांनी दिली आहे.
 ईडीची ही कारवाई अनेकांना धडकी भरवणार असल्याने आता यातून काय - काय बाहेर निघते, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. बँकेचा पैसा हा सार्वजनिक पैसा आहे. जनतेच्या पैशाची विल्हेवाट योग्य प्रकारे लावलेली नाही. त्यामुळे बँक अडचणीत आली आहे. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉंडरिंग ऍक्ट २००२ मधील तरतुदी प्रमाणे आता ही चौकशी चालू झालेली आहे.
केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करणाऱ्या प्रवर्तन निदेशालयाने या संदर्भात जिल्हा बँकेला नोटीस जारी केली असून वेगवेगळ्या प्रकारची माहिती मागून घेतली आहे. यातील काही माहिती ईडीला पोचली असल्याचेही समजते.
एकशे एक्केचाळीस कोटी रुपयांचा हा गैरप्रकार ज्या -ज्या वर्षी झाला, त्या - त्या सर्व वर्षांचे ऑडिट रिपोर्ट, त्याच प्रमाणे गैरप्रकार झाले त्या - त्या काळात बँकेवर काम करणारे अध्यक्ष, संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नावे आणि त्यांचा कालावधी, याबरोबरच बँकेतील गैर प्रकारामुळे दाखल झालेल्या सर्व फौजदारी गुन्हे बाबतची कागदपत्र बँकेकडे मागवली आहेत. तसे आदेश बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांवर बजावले असून यामुळे बँक प्रशासनात खळबळ माजली आहे.
 उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे देखील चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली असून ती कारवाई देखील चालू आहे. मात्र ही कारवाई संथगतीने चालू असल्याचे दिसत आहे. आता प्रवर्तन निदेशालयाने चालू केलेल्या नव्या चौकशीतून अनेकांना आपले जबाब ईडी कडे नोंदवावे लागणार आहेत. त्यामुळे अनेकांमध्ये घबराट देखील निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांचा कणा समजली जाणारी जिल्हा बँक अनेकांनी संगनमताने घोटाळे करत आणि महायुतीची स्थापना करून बुडवण्यासाठी कारणीभूत ठरलेले आहेत. या सर्वांना पुन्हा एकदा कायदेशीर रीतीने चपराक बसणार आहे. जिल्हा बँक पुन्हा उभी रहावी. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना बँकेमार्फत कर्ज मिळत रहावे. यासाठी बँकेचा निखळलेला कणा जोडण्यासाठी पुन्हा एकदा आपण प्रयत्न करणार असल्याचेही अँड. अजित देशमुख यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment