Tuesday, December 22, 2020

कोरोना’चा नवा अवतार अधिक निराळा व धोकादायक .

सध्या आपल्या देशात ‘कोरोना’ लसीकरणाच्या हालचालींना वेग आलेला असतानाच तिकडील ब्रिटनमधून एक भीतीदायक बातमी आली आहे. ब्रिटनमध्ये एका नव्या अवतारातील ‘कोरोना’ कहर करू लागल्याची ती बातमी आहे. ‘कोरोना’चा हा विषाणू आधीच्या विषाणूपेक्षा निराळा आणि अधिक धोकादायक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ब्रिटनचे आरोग्य सचिन मॅट हँकॉक यांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील ईशान्य भागात ‘कोरोना’च्या या नव्या अवताराचा झपाट्याने प्रसार होत आहे. या भागातील 1000 पेक्षा जास्त नागरिकांना याची लागण झाली आहे.

ब्रिटनमधील केंट शहरामध्ये ‘कोरोना’च्या या नव्या अवताराचा पेंशट सर्वात प्रथम आढळला होता. त्यानंतर या प्रकाराचा वेगाने प्रसार होत आहे. देशातील आरोग्य विभागाने ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ला याबाबत माहिती दिली आहे. या आजारावर ‘कोरोना’चे औषध लागू होईल का? याबाबत अजून तरी कोणतीही माहिती देणे शक्य नसल्याचे आरोग्य अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे. ‘कोरोना’च्या या नव्या अवताराचा प्रसार रोखण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी देशातील ख्रिसमस सण साजरा न करण्याची घोषणा केली आहे. युरोपातील जर्मनीनेही यापूर्वी ख्रिसमस आणि न्यू ईयरच्या कालखंडात देशात ‘लॉकडाऊन’ची घोषणा केली आहे. पुढील चार ते सहा महिन्यांमध्ये ‘कोरोना’चा प्रकोप वाढणार असून, परिस्थिती अधिक चिंताजनक होईल, अशी भीती मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनीही नुकतीच व्यक्त केली होती. ते वैद्यकीय तज्ज्ञ नसले तरीही त्यांच्या मताचा प्रत्यय आता ब्रिटममध्ये येऊ लागला आहे.

हे खरेच की, ब्रिटनपाठोपाठ आता अमेरिकेतही ‘कोरोना’वरील लशीस आपत्कालीन वापरास सुरुवात झाली आहे. ‘कोरोना’वरील पहिली लस ब्रिटनमध्ये मार्गारेट कीनन या वृद्ध महिलेला देण्यात आली. तर अमेरिकेत न्यूयॉर्कमधील परिचारिका सँड्रा लिंडसे यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. हे सारे खरे असले तरीही सर्वच लसी गुणकारी असल्याची खात्री पटलेली नाही. अमेरिकेतच काल एका नर्सला लस देण्यात आली आणि काही वेळातच ती घेरी येवून कोसळल्याचे वृत्त आहे. एकूण काय, तर ‘कोरोना’च्या काळोखातून बाहेर पडण्याचा प्रयत्न अवघे जग करीत असतानाच काही नवे प्रश्‍न पुढे येत आहेत.

त्यात एक नवलाईची, धोकादायक बाब अशी की, लसीच्या निमित्ताने औषध निर्मिती क्षेत्रात गळेकापू स्पर्धा सुरु झाली आहे. अमेरिकेतील मॉडर्ना कंपनीचा माहितीचा साठा चोरण्याचा प्रयत्न झाला आहे. त्याआधी फायझर आणि जर्मन कंपनी बायोएनटेकच्या माहिती साठ्यावर हल्ला करण्यात आला होता. ज्या कंपन्या ‘कोरोना’वरील लसीच्या निर्मितीत आघाडी घेत आहेत त्यांच्यावर सायबर हल्ले होत आहेत. या हल्ल्यांमागील शक्ती परिणामकारक लस रोखू पाहात आहेत की, लस निर्मिती करणार्‍या कंपन्यांची पीछेहाट त्यांना अपेक्षित आहे, याचा उलगडा अजूनही झाला नाही. त्यातच बनावट लस बाजारात येण्याचा धोका आहे. या धोक्याकडे यापूर्वीच जागतिक आरोग्य संघटनेने लक्ष वेधले आहे. एकूणच मानवी जीवन संकटात सापडले असताना औषधींमध्येही चोराचोरी, हेराफेरी, नफेखोरी, काळाबाजार होत असेल, तर ते मोठेच दुर्दैव ठरते. हे खरेच की, माणसातील हैवानी वृत्तीमुळेच ‘कोरोना’चा जगभर कहर झाला. मागील वर्षभरात प्रत्येक क्षेत्रावर त्याचा परिणाम झाला. परिणाम अणुयुद्धापेक्षा भयानक आहेत.

आपल्या देशालाही ते भोगावे लागले. भारतात मागील काही दिवसांपासून दुसर्‍या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. सुदैवाने अजूनही तरी दुसरी लाट आलेली नाही. बरे होण्याचे प्रमाणही जवळपास 96 टक्क्यांवर गेले आहे. त्याच एक आनंदाची बातमी म्हणजे लशीकरण मोहिमेसाठी केंद्राने राज्यांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. 50 ते 60 आणि 60 वर्षांपुढील नागरिक, त्याचबरोबर आरोग्य कर्मचारी यांना लसीसाठी प्राधान्य दिले जाणार आहे. फायझर आणि मॉडर्ना या महागड्या लसींच्या पार्श्वभूमीवर भारतातच वाजवी दरात लस मिळेल, हे स्पष्ट असल्याने जागतिक पातळीवर देखील या लसीद्वारे कोरोना रोखण्यासाठी भारत पुढे राहणार आहे. हे सारे खरे असले तरीही लसीकरणानंतर सर्व काही आलबेल होईल, असेही नाही. कारण अजूनही धोका टळलेला नाही. म्हणूनच वैयक्तिक आरोग्य राखतानाच सामूहिक आरोग्याचीही तितकीच किंबहुना अधिकची काळजी घ्यावी लागेल.

‘कोरोना’बाबत मार्गदर्शक तत्त्वे व प्रमाणित प्रक्रियेचे पालन करण्याच्या अभावाने ही साथ देशात वणव्यासारखी पसरली, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयानेही आपले मत व्यक्त केले आहे. म्हणूनच सर्वांनीच सर्वपातळीवर काळजी घेणे गरजेचे आहे. मुख्य म्हणजे राज्यांनी अधिक सतर्कतेने व केंद्राशी सुसंवादाने काम करण्याची गरज आहे. ‘कोरोना’ साथीच्या प्रतिबंधासाठी आणखी उपाययोजना करतानाच खासगी रुग्णालयांकडून रुग्णांवर उपचारासाठी आकारल्या जाणार्‍या शुल्कावर मर्यादा घालायला हवी. नागरिकांचे आरोग्य हा अग्रक्रम असायला हवा. मार्गदर्शक तत्त्वे व प्रमाणित प्रक्रिया संचालनाचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई करायला हवी, कारण त्यांनी इतर लोकांच्या जिवाशी खेळणे परवडणारे नाही.
‘कोरोना’ने ब्रिटनमध्ये नवा खेळ मांडलाच आहे. त्यामुळे जगाचीच चिंता वाढली असताना भारतीयांनी बेजबाबदारीने वागणे संकट ओढून घेतल्यासारखेच होईल. ब्रिटनमधील ‘कोरोना’चा तो खतरनाक नवा अवतार आपल्याकडे अजिबात दिसू नये, म्हणूनच सावधान!

No comments:

Post a Comment