महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे एकमेव आमदार रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड येथील त्यांच्या गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेड या साखर कारखान्याच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज उचलले होते. त्या प्रकरणी ईडी कडे तक्रार दाखल झाल्यानंतर ईडीने ही कारवाई केली आहे. महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांच्या नावे उचललेल्या कर्जाची रक्कम त्यांनी गंगाखेड शुगर एनर्जी लिमिटेडच्या माध्यमातूनच त्यांची मालकी असलेल्या योगेश्वरी हॅचरीज, गंगाखेड सोलार पावर लिमिटेड या इतर कंपन्यांमध्ये लावली ज्यांच्यावर आता ईडीने कारवाई केली आहे.
रात्री उशिरा केलेल्या कारवाईत ईडीकडून गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेड २४७ कोटी किमतींची यंत्र त्याचप्रमाणे पाच कोटी रुपयांची जमीन, योगेश्वरी हॅचरीज, गंगाखेड सोलर पावर लिमिटेडच्या परभणी बीड आणि धुळे येथील बँकांमध्ये असलेल्या सुमारे दीड कोटी रुपये किमतीच्या गुंतवणुकी आणि गंगाखेड शुगर्स लिमिटेड यांची एक कोटी दहा लाख रुपये किमतीचे समभाग इत्यादी मालमत्ता असे एकूण २५५ कोटीची मालमत्ता जप्त केली आहे.
शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर कोट्यवधींचे कर्ज घेतल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत गेलेल्या रत्नाकर गुट्टे यांना ५ मार्च २०२० मध्ये जामीन मिळाला होता. जवळपास वर्षभरानंतर ते बाहेर आले. दरम्यान, गुट्टे यांनी कारागृहातूनच २०१९ मध्ये गंगाखेड विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते जिंकले आणि आमदार झाले हे विशेष. २६ मार्च २०१९ रोजी रत्नाकर गुट्टे यांना औरंगाबाद येथील सीआयडी पथकाने अटक करुन गंगाखेडच्या कनिष्ठ न्यायालयात हजर केले होते. यानंतर हे प्रकरण बरीच दिवस औरंगाबाद उच्च न्यायालयात चालले. तिथे त्यांना जामीन मिळाला नाही. शेवटी उच्च न्यायालयातून त्यांनी सर्वोच न्यायालयात दाद मागितली आणि तिथेही अनेक तारखा झाल्यानंतर त्यांना तब्बल ३४६ दिवसानंतर जामीन मंजूर केला होता.
गेल्या दहा दिवसापूर्वीच रासपाचे राष्ट्रीय नेते माजी मंत्री आ.महादेव जानकर यांनी आ.रत्नाकर गुट्टे यांचा साखर कारखान्याला चालू वर्षात गाळप करण्यासाठी परवानगी देण्यात यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची भेट घेतली होती. आणि याच पवार -जानकर भेटीमुळे राजकीय पातळीवर अनेक तर्क वितर्क चर्चीले जात होते. धनंजय मुंडे यांच्या राजकीय हस्तक्षेपामुळे गंगाखेड शुगर चालू होऊ शकत नसल्याची टीका देखील रत्नाकर गुट्टे व रासपा कडून करण्यात येत होती.मात्र भाजपचा सहयोगी पक्ष असलेल्या रासपाच्या आमदारांला ईडीने दणका देऊन भाजपातुन महाविकास आघाडीच्या वाटेवर असलेल्या संभाव्य फुटीरतावादीनां एक प्रकारचा इशारा तर नाही ना ? असा कयास काढला तर वावगे ठरणार नाही.
No comments:
Post a Comment