Wednesday, June 17, 2020

बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांची खरीप पिके रामभरोसे.कोणतीही कंपनी पीक विमा काढण्यासाठी पुढे येईना .

बीड ;-- (प्रतिनीधी )- गेल्या आठवडाभरात बीड जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस बर्‍यापैकी झाल्याने जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी खरीपाच्या पेरणीला सुरुवात केली असली तरी शेतकर्‍यांच्या पिकांना संरक्षण देण्यासाठी एकही विमा कंपनीे पुढे येत नसल्याने पेर्‍याअगोदरच शेतकर्‍यांना चिंतेने ग्रासले आहे. लवकरच विमा कंपनी विमा घेण्यासाठी येईल, असे आश्‍वासन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी देऊन आठवडा उलटून गेला मात्र अद्यापही शेतकर्‍यांच्या पिकांचा विमा काढला गेला नाही. दुसरीकडे जिल्ह्यातील सत्ताधार्‍यांसह विरोधी बाकावर असलेल्या आमदार, खासदारांनी शेतकर्‍यांच्या या महत्त्वपूर्ण प्रश्‍नाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मतासाठी दारात येणार्‍या पुढार्‍यांनो पीक विम्यासाठी सरकारच्या दारात बसा, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होताना दिसून येत आहे. 
गेल्या सात-आठ वर्षांपासून बीड जिल्हा हा सातत्याने दुष्काळाच्या खाईत आहे. अशा स्थितीतही बीड जिल्ह्यातील शेतकरी पावणे आठ लाखापेक्षा जास्त हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांचा पेरा करतो. हा पेरा करण्यासाठी खत, बी-बियाणे लागणारे पैसे कर्ज स्वरुपात घेतो. मात्र कधी कमी पाऊस तर कधी गारपीटाने शेतकर्‍यांचे पीक उद्ध्वस्त होते. विमा कंपन्या शेतकर्‍यांच्या पिकांना संरक्षण देत आल्या, त्यापर्यंत शेतकर्‍यांना खर्च झालेला पैसा तरी वापस मिळत राहिला, परंतु यावर्षी तर बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा विमा घेण्यासाठी कुठलीही विमा कंपनी धाडसाने समोर येत नाही, गेल्या आठवडाभरापूर्वी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी लवकरच विमा कंपनी शेतकर्‍यांचा पिकाचा विमा घेईल, असे म्हणाले होते मात्र अद्यापपर्यंत एकही कंपनी शेतकर्‍यांचा पीक विमा काढण्यासाठी आली नाही. दुसरीकडे जिल्ह्यात सत्ताधारी पक्षांच्या आमदारांसह विरोधी बाकावरील आमदार-खासदार छोट्या-मोठ्या विषयांवर रान पेटवत असतात इथे मात्र शेतकर्‍यांचा विमा घेण्यासाठी एकही कंपनी येत नसल्याने याबाबत ना सत्ताधारी, ना विरोधक कोणीही आवाज उठवायला तयार नाही त्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी रामभरोसे आहे का? असा सवाल उपस्थित होत असताना मतासाठी दारात येणार्‍या लोकप्रतिनिधी-पुढार्‍यांनी बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा पीक विमा काढण्यासाठी सरकारच्या दारात बसावे, अशी मागणी आता होत आहे.

No comments:

Post a Comment