Tuesday, June 23, 2020

कोरोनाच्या सावटात अखेर पाठ्य पुस्तके बीड शहरात पोहचली.


बीड (प्रतिनीधी ): कोविड-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आल्यानंतर जिल्ह्याच्या सिमा सील करण्यात आल्या होत्या. त्यामुळे सार्वजनिक वाहतुक बंद असल्याने आणि औरंगाबाद जिल्हा रेडझोनमध्ये असल्याने नेमके पाठ्यपुस्तके बीडपर्यंत कशी आणायची हा प्रश्‍न समोर उभा असतांना काही प्रमाणात संचारबंदी दरम्यान शिथीलता देण्यात आली. म्हणून या दरम्यान अखेर कोरोनावर मात करीत पाठ्य पुस्तके बीड शहरात पोहचली असून आता तालुक्यातून इतर शाळेत ही पुस्तके कशी घेवून जायची? हा प्रश्‍न उपस्थित होत असून अनेक मुख्याध्यापक किंवा शाळेतील जिम्मेदार व्यक्तींनी आपल्या वाहनातुन किंवा आपल्या खर्चाने ही पुस्तके शाळेत घेवून गेल्याचे समजले. विशेष म्हणजे औरंगाबादहून ही पाठ्यपुस्तके तालुकास्तरावर पोहच केली जातात. परंतू तालुक्यातून इतर शाळेत पोहचविण्यासाठी वाहतुकीची किंवा वाहतुक करण्यासाठी खर्चाची तरतूद नसल्याने संबंधित शाळेच्या जिम्मेदारांना हा त्रास सहन करावा लागत असून पाठ्य पुस्तक घेवून जाण्यासाठी वाहतुकीवर स्वखर्च होत असल्याने संबंधित शाळेचे कर्मचारी हैराण झाले आहे. 
रेड झोनमधून येणार्‍या-जाणार्‍या प्रत्येकाला आयसोलेशन क्वारंटाईन करण्यात येत आहे. त्यामुळे बालभारती गोदाममधून पाठ्यपुस्तके उचल करण्यासाठी जिल्हा व तालुक्यामधून कर्मचारी औरंगाबाद येथे पाठवल्यास त्या कर्मचार्‍यांना कोरोना विषाणूची लागन होण्याची शक्यता असल्याने परिणामी कार्यालयातील इतर कर्मचारी व अधिकारी यांना सुद्धा सदर विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकरता येत नाही. या संदर्भात प्राथमिक शिक्षण अधिकारी यांनी कळविल्यानंतर बीड जिल्ह्याने केलेल्या मागणीनुसार राज्यस्तरावरून नियुक्त वाहतुक दरामार्फत थेट पाठ्य पुस्तके तालुकास्तरावर पाठविण्यात यावीत. पाठ्य पुस्तकाचे वाहन तालुकास्तरावर पोहचल्यानंतर पाठ्य पुस्तके उतरण्याची जबाबदारी संबंधित तालुका गटशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडे असल्याने तालुकास्तरावर आलेली पुस्तके शहरात तर उतरून घेण्यात आली. परंतू शहरातून इतर शाळेत घेवून जाण्यासाठी तरतूद नसल्याने आपआपल्या स्तरावर स्वखर्चाने संबंधित शाळेचे कर्मचारी पाठ्य पुस्तके घेवून जात असल्याचे दिसूून आले. 
गेल्या तीन वर्षापासून फक्त पत्र व्यवहार
हमखास बालभारती गोदाममधून पाठ्य पुस्तके औरंगाबाद येथे येतात आणि औरंगाबाद येथून तालुकास्तरावर ती पुस्तक पाठविण्यात येते. तालुकास्तरावरून इतर शाळेत पुस्तके वाहतुक करण्यासाठी गेल्या तीन वर्षापासून फक्त पत्र व्यवहार होतो. कोणत्याही प्रकारचा निधी पाठ्य पुस्तके घेवून जाण्यासाठी उपलब्ध नसल्याने संबंधित शाळेतील मुख्याध्यापक शिल्लक निधीतून किंवा स्वखर्चाने ही पाठ्य पुस्तके घेवून जातात. गेल्या तीन वर्षापासून शिक्षणाधिकारी तालुकास्तरावर वाहतुकीसाठी पत्र व्यवहार करून खर्च किती होईल याचा अंदाज मागवितात परंतू प्रत्यक्षात वाहतुकीसाठी तरतूद होत नाही. याकडे शिक्षण विभागाने लक्ष दिले तर मुख्याध्यापकांची होणारी हेळसांड थांबणार.

No comments:

Post a Comment