गेवराई, दि.18 (प्रतिनिधी); तालुक्यातील चकलांबा, गेवराई व पाचेगाव महसुल मंडळातील 22,451 कापूस उत्पादक शेतकर्यांना पिक विमा कंपनीने नुकसान भरपाईपासून वंचित ठेवले आहे. सिरसदेवी महसुल मंडळातील शेतकर्यांना कापूस पिकासाठी 62 रुपये प्रती हेक्टरी नुकसान भरपाई मंजुर करून शेतकर्यांची क्रुर चेष्टा केली आहे. तुर उत्पादक शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, यामुळे कोरोनाच्या संकटात हवालदिल झालेल्या शेतकर्यांमध्ये पिक विमा कंपनीच्या विरोधात असंतोष पसरला असून या शेतकर्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केले आहे.
खरीप 2019 च्या पिक विमा नुकसान भरपाईचे वाटप करताना विमा कंपनीने गेवराई तालुक्यातील चकलांबा, गेवराई व पाचेगाव महसुल मंडळातील कापूस उत्पादक शेतकर्यांना सरसकट वगळलेले आहे. सुमारे 22,451 शेतकर्यांनी पिक विमा हप्ता भरूनही त्यांना नुकसान भरपाई रक्कम विमा कंपनीने दिली नाही, विमा क्लेम नाकारताना कंपनीने कोणतेही सबळ कारण शेतकर्यांना दिलेले नाही. एकीकडे शासनाच्या कृषी विभागाने सर्व पिकांचे नुकसान झाल्याचे मान्य केलेले असताना विमा कंपन्यांनी क्लेम नाकारणे चुकीचे असल्याचे मत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी तालुक्यातील पिक विमा कंपनीने क्लेम नाकारलेल्या पिकांचा आढावा घेतला. सिरसदेवी महसुल मंडळातील शेतकर्यांना कापूस पिकासाठी प्रतीहेक्टरी केवळ 62 रुपये नुकसान भरपाई मंजुर केल्यामुळे तर शेतकर्यांची क्रूर चेष्टा केल्याचे त्यांनी सांगितले. गेवराई तालुक्यात खरीप 2019 मध्ये 15,875 हेक्टर क्षेत्रातील तुर उत्पादक शेतकर्यांनी पिक विम्यासाठी विमा हप्ता भरला होता. या सर्व शेतकर्यांना विमा कंपनीने कोणतेही सबळ कारण न देता पिक विमा नाकारला आहे. या बाबी शेतकर्यांवर अन्यायकारक असल्याचे मत विजयसिंह पंडित यांनी व्यक्त केले.
शेवटी बोलताना विजयसिंह पंडित म्हणाले की, मृगबहार फळपिक विमा योजनेत धोंडराई जिल्हा परिषद गटातील मोसंबी उत्पादक शेतकर्यांना सुध्दा विमा कंपनीने वगळलेले आहे. तुरीप्रमाणेच कांदा उत्पादक शेतकर्यांना सुध्दा सरसकट विमा संरक्षण विमा कंपनीने नाकारलेले आहे. माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या माध्यमातून कृषी आयुक्त, जिल्हाधिकारी व संबंधितांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. कोरोनाच्या संकटकाळात अगोदरच शेतकरी आर्थिकदृष्ट्या हतबल झाला असून शेतकर्यांना पेरणीच्या काळात पैशांची गरज आहे. अशावेळी विमा कंपनीने क्लेम नाकारून त्यांच्यावर अन्याय करणे खपवून घेतले जाणार नाही. गरज पडल्यास शेतकर्यांच्या हक्कासाठी आपण आंदोलनाची भुमिका घेणार असल्याचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment