बीड (प्रतिनीधी )- माळापुरी रस्त्यावरील कुर्लाजवळील पुलावर संशयितरित्या उभ्या असलेल्या गाडीकडे बीड ग्रामीण पोलिसांच्या गस्तीवर असलेले एपीआय योगेश उबाळे यांची नजर गेली. त्यांनी तात्काळ संबंधित गाडीजवळ आपली गाडी नेऊन खाली उतरत गाडीमधील अज्ञात दरोडेखोरांना इथे का थांबलात, असे म्हणत रिव्हॉल्व्हर रोखून पाचही जणांची तपासणी केली असता त्यांच्याकडून शस्त्र मिळून आले. या पाचही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरुद्ध बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री अडीच वाजता बीड ग्रामीणचे एपीआय योगेश उबाळे, चालक कृष्णकांत बडे व एक होमगार्ड पेट्रोलिंग करत असताना त्यांना माळापुरी रोड, कुर्ला ब्रिजच्या जवळ एक संशयित गाडी उभी दिसली. त्यानंतर पोलिसांनी त्या गाडीसमोर आपली गाडी लावत गाडीची लाईट समोरच्या चालकाच्या डोळ्यांवर चमकवला व क्षणार्धात एपीआय उबाळे हे गाडीतून उतरत थेट समोरच्या गाडीतील लोकांवर पिस्तुल रोखत त्यांची चौकशी केली. या वेळी त्यांच्याकडे दोन चाकू, एक कटर, एक स्क्रू ड्रायव्हर व एक मोठी बॅटरी आढळून आली. ते कुठे तरी दरोडे टाकण्याच्या उद्देशाने जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या वेळी त्यांनी गाडीतील पाचही आरोपींना ताब्यात घेऊन बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात आणले. यानंतर बीड ग्रामीण पोलिस ठाण्याचे एपीआय योगेश उबाळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी किशोर शिवदास पवार (रा. वडीगोद्री जि. जालना), दुसरा राम लक्ष्मण जाधव (वय 23 रा. उमापूर ता. गेवराई), तिसरा दादा लाला जाधव (वय 20, रा. उमापूर ता. गेवराई), चौथा विजय ज्ञानदेव चांदणे (वय 24, रा. रामगाव, ता. अंबड जि. जालना) तर एक 15 वर्षीय उमापूर येथील अल्पवयीन मुलासह पाच जणांवर बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात कलम 399, 402, 188, 269, 270 भा.दं.वि.सह 51 (बी) (डीएम) अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडून पाच मोबाईलसह एक गाडी असा एकूण 3 लाख 20हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एपीआय सुजित बडे हे करत आहेत. पाचही आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले. सदरील कारवाई पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधिक्षक विजय कबाडे, पोलिस उपअधिक्षक भास्कर सावंत, बीड ग्रामीणचे ठाणेप्रमुख सुजीत बडे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय योगेश उबाळे, चालक कृष्णकांत बडे व एक होमगार्ड यांनी केली.
No comments:
Post a Comment