* सात दिवसांपासून कोविड रुग्णालयात घेत होता उपचार.
बीड (प्रतिनीधी )ः-जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या लक्षणीय वाढत असताना जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढेल, अशी घटना आज सकाळी उघडकीस आली. खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी कोरोना बाधीत आढळल्याने त्याला जिल्हा रुग्णालयाच्या कोविड वॉर्डात उपचारासाठी २२ जुलै रोजी दाखल करण्यात आले होते. गेल्या सहा दिवसांपासून तो त्या ठिकाणी उपचार घेत होता मात्र काल रात्री त्याने उपस्थित पोलिस गार्डाची नजर चुकवून पळ काढला. आज सकाळी जेंव्हा कोरोना बाधीत आरोपी पळून गेल्याची माहिती उघड झाली तेव्हा पोलिस प्रशासनासह आरोग्य प्रशासन हादरून गेले. गार्ड असताना आरोपी पळून गेल्याने एकीकडे संताप व्यक्त होत असतानाच दुसरीकडे हा बाधीत असल्यामुळे तो आता किती जणांच्या संपर्कात येईल आणि कोरोना संसर्ग किती प्रमाणावर वाढविल याची धास्ती आरोग्य प्रशासनाला आहे. याआधीही निगेटिव्ह आलेला रुग्ण क्वॉरंटाईन सेंटरमधून पळून गेला होता. बाधीत असलेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिस प्रयत्नांची परिकाष्ठा करत आहेत.
केज तालुक्यातील दहीफळ वडमाऊली येथील पुजार्याची हत्या करुन फरार झालेल्या ईटकूर ता.कळंब येथील ५५ वर्षीय आरोपीच्या कळंब येथून पोलीसांनी मुसक्या अवळून न्यायालयासमोर त्याला हजर करण्यात आले होते. या वेळी न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. कोठडीत ठेवण्याअगोदर कोरोना टेस्ट करणे बंधनकारक असल्याने त्या आरोपीची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्या वेळी २२ जुलै रोजी कोरोना बाधीत आढळून आल्याने त्याला मुख्यालय पोलिसांमार्फत उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. गेल्या सहा ते आठ दिवसांपासून सदरच्या आरोपीवर बीडच्या कोविड रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. त्याच्या बंदोबस्तासाठी दोन गार्ड ठेवण्यात आलेले होते. काल रात्री मात्र खुनाच्या गुन्ह्यातील आणि कोरोना बाधीत असलेल्या या आरोपीने आपला रंग दाखवला आणि दोन्ही गार्डांची नजर चुकवून त्याने कोविड रुग्णालयातून पळ काढला. तो अद्याप मिळून आला नाही. एक तर तो खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातला आरोपी आणि त्यात तो कोरोनाबाधीत असल्याने पोलिस प्रशासनासह आरोग्य प्रशासनाची या घटनेने झोप उडवून टाकली असून हा आरोपी आता बाहेर किती जणांना भेटणार, कोरोना संसर्ग किती वाढवणार याची चिंता वाढली असून सदरच्या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिस प्रयत्नांची परिकाष्ठा करत असल्याचे सांगण्यात येते. यंत्रणेकडून खबर्यामार्फत माहिती घेणे सुरू आहे.
No comments:
Post a Comment