* रुग्णांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांना वेळेवर उपचार मिळणे आवश्यक
वेळेवर उपचार द्यायचे असतील तर कर्मचारी वाढवण्याची गरज .
बीड (प्रतिनीधी )-शहरासह जिल्ह्यात कोरोना समुहसंसर्ग झपाट्याने वाढत असल्याने मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधीत रुग्ण आढळून येत असून जिल्ह्यात आता बाधितांची संख्या दीड हजाराच्या घरात गेली आहे. अशा परिस्थितीत बाधितांवर उपचार करणार्या तोटक कर्मचार्यांवर प्रचंड ताण पडत असून त्यामुळे बाधीत रुग्णांकडे दुर्लक्ष होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्याचा दूरगामी परिणाम रुग्णाच्या आत्मविश्वासावर पडून तो थेट मृत्यूच्या दारात जात असल्याचे धक्कादायक आणि सत्य चित्र सध्या बीडच्या कोविड रुग्णालयामध्ये पहावयास मिळत असल्याने जिल्हाधिकारी साहेब आता रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयात मनुष्यबळ वाढवावा लागेल. कर्मचार्यांची संख्या वाढवावी लागेल. एक नर्स किंवा एक डॉक्टर पाच -पन्नास रुग्णांना सांभाळू शकत नाही हे सत्य आता स्वीकारावा लागेल. त्यामुळे रुग्णांची हेळसांड थांबवण्यासाठी कर्मचार्यांची तात्काळ भरती करा अशी मागणी पुढे येत आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना रोखण्यासाठी जिल्हाधिकार्यांसह आरोग्य प्रशासनाने आजपर्यंत प्रचंड मेहनतीचं काम केलं. अठरा-अठरा तास काम करणार्या या अधिकारी-कर्मचार्यांचे कौतुकच. आजपर्यंत जिल्हाधिकारी साहेबांनी जो आदेश काढला त्या आदेशाचे तंतोतंत पालन जिल्ह्यातील जनतेने केले. दुर्दैवाने गेल्या महिन्याभरात समुहसंसर्ग वाढला आणि कोरोना बाधीतांचा आकडा दिड हजारापर्यंत गेला. त्यामुळे बीड शहरातील कोविड सेंटरमध्ये कॉटची कमतरता, कर्मचार्याची कमतरता अधिक तीव्रतेने भासू लागली. आज पॉझिटिव्ह रुग्ण कोविड सेंटरमध्ये गेला की त्याला सकाळी एखादी गोळी दिली जाते त्यानंतर त्या रुग्णाकडे डॉक्टर किंवा आरोग्य कर्मचारी पुन्हा फिरकताना दिसत नाही. बीडच्या जिल्हा रुग्णालयात आणि कोविड रुग्णालयात रुग्णाकडे दुर्लक्ष होते हे रुग्णच आता ओरडून सांगत आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असल्याने त्या रुग्णांचा आत्मविश्वास ढळत चालला. आता आपल्याकडे बघायला कोणी नाही, धिर द्यायला घरचे लोकही नाहीत, आता आपण मरणाच्या दारात आहोत, असे रुग्णांना वाटू लागलं आणि त्या भितीतूनच कोरोना बाधीतांचा मृत्यू होत असल्याचा दावा आता थेट कोरोना बाधीत रुग्णच करू लागले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी साहेब, कोरोना बाधीतांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांना वेळेवर उपचार मिळावे यासाठी कोविड रुग्णालयात कर्मचार्यांची संख्या वाढवणे नितांत गरजेचे आहे. कोरोना बाधीतांवर उपचार करणार्या यंत्रणेवर ताण पडणार नाही याची दक्षता घेणे गरजेचं आहे. रुग्णात आत्मविश्वास वाढवणे अधिक महत्वाचे आहे, त्यामुळे कर्मचार्यांची संख्या वाढवा, तात्पुरती नोकर भरती करा, परंतु अविश्वासाने आपल्याकडे कोणी लक्ष देत नाही या भावनेने कोणी मरणार नाही याची दक्षता घ्या.
No comments:
Post a Comment