
गेवराई -(प्रतिनीधी ) गोकुळाष्टमीला उपवासाची भगर खाल्याने तब्बल 50 ते 60 जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथे समोर आला. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून गावातील अनेकांना उलटी,मळमळ होऊ लागल्याने गेवराई येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर अनेकांना बीड येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याबाबत माहिती मिळताच तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय कदम यांच्यासह आरोग्य विभागाच्या टीम गावात दाखल झाली. यावेळी गावात ज्यांना असा त्रास होत आहे त्यांनी उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल व्हावे असे आवाहन करण्यात येत असून विषबाधा झालेल्या रुग्णांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. गोकुळाष्टमीचा उपवास असल्याने तळणेवाडी येथील नागरिकांनी गोकुळाष्टमी उपवासानिमित्त गावातीलच एका किराणा दुकानातून भगर खरेदी केली असून यातूनच विषबाधा झाली आसल्याचा प्राथमिक अंदाज येथील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. ज्यांनी ज्यांनी भगरीचा भात खाल्ला त्याच ग्रामस्थांना मळमळ, उलटी, जुलाबअसा त्रास जाणवू लागला असून दुपारी दोन तीन वाजेपासूनच गावातील जवळपास 60 ते 70 पेक्षा अधिक जणांना हा त्रास जाणवू लागल्याने गावात एकच खळबळ उडाली यातील जवळपास 50 ते 60 जणांना गेवराई येथील कुसूम हाँस्पिटल या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून येथील डॉ.अशोक काळे यांनी या रुगणावर तात्काळ उपचार सुरू केले आहेत. तर या घटनेची माहिती कळताच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम यांनी तळणेवाडी येथे धाव घेत त्रास होणाऱ्या नागरिकांना गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे असे अवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment