Tuesday, August 11, 2020

गेवराईत वाळुचे तीन हायवा पकडले. पोलिसांना धक्काबुक्की करून मालकाने एक हायवा केला लंपास.


गेवराई (प्रतिनीधी );- चकलांबा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उमापूर फाट्याजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या  पथकाने पहाटे साडे तीन वाजता तीन हायवा ताब्यात घेतल्या. पथकात पाच कर्मचारी असल्याने पोलिसांनी सुरुवातीला पकडलेला हायवा चकलांबा पोलिस ठाण्यात कारवाईसाठी तीन पोलिसांसोबत पाठवला. मात्र चकलांबा फाट्याजवळ हायवा पोहचताच हायवा मालकाने स्कॉर्पिओ गाडी आडवी लावत हायवामधील तीन पोलिस कर्मचार्‍यांना धक्काबुक्की करून तो हायवा पळवून नेल्याची घटना रात्री घडली. या प्रकरणी चकलांबा पोलिस ठाण्यात मालकासह हायवा चालक आणि अन्य चार लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 याबाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चकलांबा पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्री कारवाईसाठी गेले होते. या वेळी राक्षसभुवनकडून उमापूरकडे तीन हायवा वाळू घेऊन जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी उमापूर फाटट्ाजवळ तिन्ही हायवा ताब्यात घेतले. हायवा (क्र. एम.एच. १२ एन.एक्स. ९५९७) याच्यावर कारवाईसाठी चकलांबा पोलिस ठाण्यात पाठवला. या वेळी सोबत तीन कर्मचारी होते. हायवा चकलांबा फाट्याजवळ पोहचल्यानंतर पाठीमागून हायवाचा मालक युवराज उत्तम कठाळे (वय ३८, रा. दहिवंडी ता. शिरूर) यासह अन्य चार जण स्कॉर्पिओमध्ये आले व स्कॉर्पिओ (क्र. एम.एच. २३ वाय. १७९५) आडवी लावून आतमध्ये असलेल्या पोलिसांना दमदाटी करत धक्काबुक्की केली व हायवा घेऊन पळ काढला. पाठीमागे असलेले दोन हायवा घेऊन पथकप्रमुख आनंद कांगुणे आणि अन्य एक कर्मचारी तेथे आले व मात्र तोपर्यंत ते फरार झाले होते. रात्री ताब्यात घेतलेल्या हायवामध्ये एम.एच. २० डी. ई ३११५, दुसरी एम.एच. १६ सी.सी. ५३७९ या दोन गाड्या चकलांबा पोलिस ठाण्यात कारवाईसाठी पाठवल्या तर हायवा क्र. एम.एच. १२ एन.एक्स. ९५९७ या गाडीचा मालक युवराज उत्तम कठाळे व चालक बाळु मोरे सह अन्य चौघांवर चकलांबा पोलिस ठाण्यात पोलिसांना धक्काबुक्की केल्या प्रकरणी व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी कलम ३५३, ३४१, ३३२, ३७९, २६९, २७०, १४३, १४९, ५०६, १८८ भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास चकलांबा पोलिस करत आहेत. सदरील कारवाई पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, डीवायएसपी भास्कर सावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख आनंद कांगुणे, पो.ना. झुंबर गर्जे, संतोष हंगे, गोविंद काळे, अन्वर शेख गहिनीनाथ गर्जे यांनी केली. 

गेवराई महसूल प्रशासन गप्प का..?
गेवराई तालुक्यात राजरोसपणे मोठ्या प्रमाणावरअवैध वाळु उपसा होत आहे. मात्र स्थानिक महसूल प्रशासन कारवाई करण्यात निष्फळ ठरत असल्याने बीडच्या पथकांना गेवराई तालुक्यात येऊन कारवाई करावी लागत आहे. तर रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असतानाही स्थनिक प्रशासन गप्प का असा सवाल उपस्थित होत आहे.

No comments:

Post a Comment