
नवी दिल्ली (वृत्तसेवा)- करोरोनाने देशभरात थैमान घातले असून अनेक राजकीय नेते कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. काही लोकप्रतिनिधींना आपला जीवही गमवावा लागलेला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अद्यापही प्रयत्न सुरुच असून गेल्या २४ तासात देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपाच्या पाच नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना रविवारी कोरोनाचे लक्षण दिसून येऊ लागल्याने त्यांची टेस्ट केली असता ते पॉझिटिव्ह आले. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अमित शहा हे रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेत असल्याची माहिती दिली. अमित शहा हे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. प्रकृती ठिक असल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे गेल्या काही दिवसात शहा यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी आपली चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. त्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनाही कोरोनाची लागण झाल्याचा खुलासा येडियुरप्पा यांनीच ट्विटरवर केला. त्यापाठोपाठ तामिळनाडुचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, भाजपाचे युपी प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव आणि उत्तर प्रदेशचे जलशक्ती मंत्री महेंद्र सिंह यांनाही कोरोनाची लागण झाली असून युपीच्या उच्च व तंत्र शिक्षणमंत्री कमला राणी वरुण यांचा रविवारी कोरोनाने मृत्यू झाला आहे
No comments:
Post a Comment