छत्रपती संभाजीनगर :(प्रतिनिधी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या स्थापनेपासून आजपर्यंत सेवा केलेल्या सर्व माजी कुलगुरूंच्या प्रतिमा कुलगुरू दालनात लावण्यात आल्या आहेत. कोणत्याही आस्थापनेत मुख्य पदावर काम केलेल्या व्यक्तींच्या नावाची यादी, प्रतिमा व कार्यकाल दिलेला असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात माजी कुलगुरूंच्या नावांची यादी लावण्यात आलेली होती. मात्र, माजी कुलगुरूंच्या प्रतिमा लावण्यात आलेल्या नव्हत्या. ही बाब लक्षात आल्यावर सर्व कुलगुरुंच्या प्रतिमा लावण्याचे आदेश कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी आस्थापना विभागाला दिले.
विद्यापीठाच्या स्थापनेनंतर ६५ वर्षात विद्यापीठास १६ पूर्णवेळ कुलगुरु लाभले. मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य असलेल्या एस. आर. डोंगरकेरी यांना पहिले कुलगुरु होण्याचा बहुमान मिळाला. नामविस्तारावेळी कुलगुरू डॉ. विठ्ठलराव घुगे होते. डॉ. बी.ए.चोपडे हे १५ वे कुलगुरू होते. तर प्राध्यापक डॉ.प्रमोद येवले हे १६ वे पूर्णवेळ कुलगुरु असून ’औषधनिर्माणशास्त्र’ विद्याशाखेतून आलेले पहिले कुलगुरु आहेत. १६ जुलै २०१९ ते ३१ डिसेंबर २०२३ असा त्यांचा कार्यकाळ आहे. विद्यापीठाचे छायाचित्रकार पंकज बेडसे यांनी या सर्व छायाचित्रांचे संपादन केले आहे. आजपर्यंतच्या सर्व १५ माजी कुलगुरु यांच्या प्रतिमा दोन दिवसांपूर्वी लावण्यात आल्या आहेत, अशी माहिती कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी दिली.
साहित्य, संस्कृती, विज्ञान, तंत्रज्ञान, विधी आदी क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या कुलगुरूंची परंपरा आपल्या विद्यापीठाला लाभली आहे. आजपर्यंत मला पाच विद्यापीठांच्या कुलगुरूपदी काम करण्याची संधी मिळाली. उर्वरित चारही विद्यापीठांमध्ये कुलगुरूंच्या नावासह कार्यकाळ व प्रतिमा लावण्यात आलेले आहेत. या विद्यापीठात सर्व माजी कुलगुरूंच्या प्रतिमाही सन्मानपूर्वक कुलगुरूंच्या दालनात लावण्यात आल्या आहेत.
- डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू
No comments:
Post a Comment