बीड (प्रतिनिधी) शासनाने मुद्रांक शुल्क व दंड सवलत अभय योजना लागू केली आहे. ३१ मार्चपर्यंत असलेल्या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. या योजनेमध्ये ता. एक जानेवारी १९८० ते ३१ डिसेंबर २००० या कालावधीत नोंदणी दाखल केलेले किंवा न केलेले दस्त यांच्या बाबतीतील शासनास देय होणाऱ्या तथा वसुलीपात्र संपूर्ण मुद्रांक शुल्क आणि त्यावर लागू होणाऱ्या दंडामध्ये सूट असेल, अशी माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी अशोक आटोळे यांनी दिली.
ता. एक जानेवारी १९८० ते डिसेंबर २००० या कालावधीतील दस्तांसाठी योजनेच्या पहिल्या टप्प्यात देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम एक लाखापर्यंत असल्यास मुद्रांक शुल्क व दंडाची संपूर्ण माफी तसेच देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम एक लाखाच्यावर असल्यास मुद्रांक शुल्कात ५० टक्के सवलत व दंडाची संपूर्ण माफी असेल. तर, योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम एक लाखापर्यंत असल्यास मुद्रांक शुल्कात व दंडामध्ये ८० टक्के कपात असेल.
तसेच देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम एक लाखाच्यावर असल्यास मुद्रांक शुल्कात ४० टक्के दंडामध्ये ७० टक्के माफी असेल. ता. जानेवारी २००१ ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीतील दस्तांसाठी योजनेच्या पहिल्या टप्प्यात देय होणारी मुद्रांक शुल्काची रक्कम २५ कोटीपर्यंत असल्यास मुद्रांक शुल्कात २५ टक्के माफी व दंडाची रक्कम ही २५ लाखांपेक्षा कमी असल्यास दंडामध्ये ९० टक्के माफी तसेच दंडाची रक्कम २५ लाखांपेक्षा जास्त असल्यास केवळ २५ लाख रुपये दंड वसूल करण्यात येईल. मुद्रांक शुल्काची रक्कम २५ कोटींपेक्षा जास्त असल्यास मुद्रांक शुल्कात २० टक्के माफी तसेच दंडात एक कोटी रक्कम स्वीकारून उर्वरित दंडाच्या रकमेत सूट मिळेल.
No comments:
Post a Comment