तत्कालिन अधिकारीवर गुन्हा
बीड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात तत्कालीन अधिकाऱ्याचा बनावट वाहन पुनर्नोंदणीचा नवा घोटाळा चव्हाट्यावर आला आहे. परराज्यातील तब्बल १९ वाहनांची बनावट नोंदणी करून अभिलेखे नष्ट केल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. याबाबत बीड ग्रामीण ठाण्यात तत्कालीन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्कालीन अधिकारी नकाते यांची यापूर्वी औरंगाबादेतही वादग्रस्त कारकीर्द राहिलेली आहे. बनावट नोंदणी करणाऱ्या रॅकेटशी त्यांचे संबंध पुन्हा एकदा उघड झाले आहेत. ते सध्या परभणी येथे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आहेत.
तक्रारीत काय म्हटलंय?
उपप्रादेशिक कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक संतोष पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १ जुलै ते ३० नोव्हेंबर २०२० या कालावधीत नकाते यांनी परराज्यातील बनावट किंवा चोरीच्या वाहनांची बनावट चेसिस क्रमांक व कागदपत्रांआधारे बेकायदेशीररीत्या पुनर्नोंदणी केली. त्यानंतर या वाहनांचे मूळ दस्तऐवज गायब केले.
विशेष म्हणजे वाहनांच्या पुनर्नोंदणीच्या कामाचे वेगवेगळे टप्पे असून त्यात तपासणी, परवानगी व नंतर नोंदणी केली जाते. मात्र, लिपिक, वाहन निरीक्षक व नोंदणी अधिकाऱ्याचे कामही तत्कालीन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नकाते यांनी स्वतःच केल्याचे उघड झाले आहे. १९ पैकी १६ वाहनांवर कर्ज आहे. तर या १६ वाहनांना ९ फायनान्स कंपन्यांनी कर्ज पुरवठा केलेला आहे. कर्जाची रक्कम तीन कोटींच्या घरात आहे.
No comments:
Post a Comment