गंगाखेड (प्रतिनिधी) पोलीसठाण्या अंतर्गत असलेल्या पुर्णा तालुक्यातील देऊळगाव दुधाटे येथे परभणी आगाराची मुक्कामी बस जळून खाक झाल्याची घटना आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास घडली आहे. घटनेची माहिती समजताच पोलीसांनी देऊळगाव दुधाटे येथे धाव घेतली असून, बस जळाली की कोणी जाळली याचा तपास पोलीस करीत आहेत.
माहितीनुसार, पुर्णा तालुक्यातील देऊळगाव दुधाटे येथे दि. 17 फेब्रुवारी रोजी परभणी आगाराची बस (क्रमांक एमएच 20 बीएल 0450) नेहमीप्रमाणे रात्री 8:30 वाजता प्रवासी घेऊन मुक्कामाला आली. चालक हरी व्यंकटराव खजे, वाहक शरद शंकरराव मुलगीर यांनी बस गावातील मंदिराजवळील मैदानात उभी करून झोपी गेले. आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास झोपेतून जागे झालेले चालक हरी खजे हे प्रांतविधीला गेले. परत आल्यानंतर अंदाजे साडे तीन ते चार वाजेच्या सुमारास बस जळाल्याचे दिसल्याने चालक व वाहकांनी बादलीने पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. चालक, वाहकाचा गर्दा ऐकून मंदिरातून धावत आलेल्या ग्रामस्थांच्या मदतीने बसला लागलेली आग विझविण्याचा अथक प्रयत्न करून सुद्धा ही आग विझण्याऐवजी आणखीनच भडकल्याने, याची माहिती गंगाखेड पोलीसांना देण्यात आली.
या घटनेची माहिती समजताच पहाटे पाच वाजेच्या सुमारास गंगाखेड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक सिद्धार्थ इंगळे, जमादार उमाकांत जामकर, चालक सुग्रीव सावंत, गजेंद्र चव्हाण, संदीप गिते आदींनी घटनास्थळी देऊळगाव दुधाटे येथे धाव घेतली. पोलीस प्रशासनाचे अधिकारी पोहचेपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती. या घटनेची माहिती समजताच पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास देऊळगाव दुधाटे येथे भेट देऊन पाहणी करत माहिती जाणून घेत उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना तपासासंबधी सूचना दिल्या.
पुर्णा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील, पालम पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांच्यासह पुर्णा तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. आगीच्या घटनेत बस जळून खाक झाली असली तरी, ही आग कोणी लावली? का लागली? हे समजले नव्हते. यामुळे या घटनेचा तपास गंगाखेड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेकडून अधिक बारकाईने करत असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी बस चालक व वाहक गंगाखेड पोलीस ठाण्यात आले असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
No comments:
Post a Comment