माजलगाव -(प्रतिनिधी) वैयक्तिक जलसिंचन विहिरीच्या नाहरकत प्रमाणपत्रासाठी 3 हजारांची लाच स्वीकारताना जलसंपदा विभागातील कारकूनास एसीबीने रंगेहात पकडले.ही कारवाई मोरेश्वर टी हाऊस समोर रोड वर, फुले पिंपळगाव चौक, केसापुरी कॅम्प, माजलगाव येथे करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने तक्रार दाखल केली होती की, त्यांच्या वडिलांच्या नावे मौजे मोठेवाडी ता. माजलगाव गट नं. 277 मध्ये शेत आहे. सदरच्या शेताचे अनकमांड प्रमाणपत्र (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत वैयक्तिक जलसिंचन विहीरी करिता नाहरकत प्रमाणपत्र) मिळण्यासाठी अर्ज केला होता.मात्र कारकून लाच मागत असल्याचं तक्रारदाराने म्हटलं होतं. दरम्यान सदर अर्जावरून तक्रारदार यांना नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी पंचासमक्ष 3 हजार पाचशे रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 3 हजार रू. स्वीकारण्याचे कारकूनाने मान्य केले. त्यावरून एसीबी ने सापळा रचला. यावेळी पंचासमक्ष स्वतः लाच स्वीकारली असता कारकूनास लाचेच्या रकमेसह लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले व ताब्यात घेतले त्याच्या विरुद्ध पोलीस ठाणे माजलगाव शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पार पाडली.
No comments:
Post a Comment