Monday, February 6, 2023

दहावी-बारावी विद्यार्थ्यांनो उत्तरपत्रिका लिहिण्यापूर्वी ‘या’ २२ सूचना लक्षात ठेवा.



औरंगाबाद (कांतीकारी साथी न्युज) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षाच्या तारखा काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार दहावीच्या परीक्षा २ ते २५ मार्च दरम्यान घेतल्या जाणार आहेत, तर बारावीच्या परीक्षा येत्या २१ फेब्रुवारी ते २१ मार्चदरम्यान होणार आहेत. त्यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षेत उत्तरपत्रिका लिहिण्यापूर्वी कोणत्या सूचनाचे पालन करावे, याबाबतची माहिती मंडळाकडून सांगण्यात आली आहे. उत्तरपत्रिका लिहिण्यापूर्वी २२ सूचना दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना लक्षात घ्याव्या लागणार आहेत. त्या सूचना नेमक्या कोणत्या? जाणून घ्या.

  1. परीक्षार्थींनी दररोज आपल्या जवळ प्रवेशपत्र आणि ओळखपत्र ठेवावे. जेणेकरून केंद्रावरील पर्यवेक्षक आणि अधिकाऱ्यांना दाखविता येईल.
  2. प्रत्येक पेपरच्या वेळी पर्यवेक्षकाकडून परीक्षार्थींना बारकोड स्टिकर दिला जाईल. त्यावेळी विषय आणि बैठक क्रमांकाची खात्री करावी आणि उपस्थिती पत्रकावर बैठक क्रमांक, बारकोड स्टिकर क्रमांकासह स्वाक्षरी करावी. मग त्यानंतर उत्तरपत्रिकेवर दिलेल्या जागेवरच बारकोड स्टिकर काळजीपूर्वक चिकटवावा.
  3. उत्तरपत्रिकेच्या मुख्यपानावर आणि पुरवणी उत्तरपत्रिकेवर ठराविक रकान्यात बैठक क्रमांक अंकात आणि अक्षरात न चूकता लिहावा आणि स्वाक्षरी करावी.
  4. पर्यवेक्षकाकडे उत्तरपत्रिका जमा करताना ती सुस्थितीत असल्याची आणि सर्व पानं असल्याची खात्री करावी.
  5. उत्तरपत्रिकेच्या पृष्ठ क्र. ३ पासून लिहिण्यास सुरुवात करावी.
  6. महत्त्वाचे उत्तरपत्रिकेच्या फक्त डाव्या बाजूस समास सोडावा. दोन्ही बाजूस सोडू नये.
  7. उत्तरपत्रिकेच्या प्रत्येक पानाच्या दोन्ही बाजूला लिहावे. कोणतेही पान फाडू नये, नाहीतर ते शिक्षेस पात्र राहिल.
  8. पर्यवेक्षकाची स्वाक्षरी ही उत्तरपत्रिकेवर आणि पुरवण्यांवर असल्याची खात्री करावी. शिवाय उत्तरपत्रिकेबरोबर जोडलेल्या पुरवण्याची संख्या ही उत्तरपत्रिकेवरील मुख्यपृष्ठावर लिहावी.
  9. प्रश्नपत्रिका मिळल्यानंतर प्रत्येक पानावर उजव्या बाजूस बैठक क्रमांक लिहून १० मिनिटं फक्त प्रश्नपत्रिक व्यवस्थितरित्या वाचावी.
  10. कच्चे लिखाण पेन्सिलनेच उत्तरपत्रिकेच्या डाव्या हाताच्या पानावर करावे आणि कच्चे लिखाण असा स्पष्ट उल्लेख करावा. प्रश्नपत्रिकेवर किंवा इतर कोणत्याही कागदावर कच्चे लिखाण करू नये.
  11. एखाद्या प्रश्नाचे उत्तर लिहिण्यापूर्वी समासात अचूक सेक्शन, प्रश्न, उपप्रश्न क्रमांक लिहावा. यासाठी वेगवेगळ्या शाईचा वापर करू नये.
  12. एकाच सेक्शनच्या प्रश्नाच्या वेगवेगळ्या प्रश्न, उपप्रश्नासाठी वेगवेगळ्या पानाचा वापर करू नये.
  13. परीक्षार्थीने उत्तराचा काही भाग खोडल्यास किंवा त्याला शाईत बदल करावा लागला, किंवा कोरा भाग सोडल्यामुळे त्या ठिकाणी निळ्या, काळ्या शाईने रेघ मारली असेल अशा ठिकाणी पर्यवेक्षकाची स्वाक्षरी घेऊ नये.
  14. निळ्या अथवा काळ्या शाईचाच वापर उत्तरपत्रिकेवर लिहिताना करावा. जर केला नाही तर मजकुरास गुणदान केले जाणार नाही.
  15. परीक्षार्थ्याविरुध्द खालीलपैकी कोणत्याही कारणास्तव नियमानुसार शिक्षेची कारवाई होऊ शकेल. अ) पुस्तक, नोट्स, मजकूर असलेला कागद परीक्षा दालनात आणणे, शरीरावर, कपड्यावर मजकूर लिहिलेला असणे. च) कोणत्याही परीक्षार्थ्याशी बोलणे / संपर्क साधणे / एकट्याने अथवा सामुदायिक कॉपिंग करणे. क) प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका अथवा उत्तरपत्रिकेतील पाने किंवा पुरवणी परीक्षा कक्षातून बाहेर नेणे, ड) उत्तरपत्रिका, पुरवणी उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिका आदीची अदलाबदल करणे, इतरांना देणे-घेणे. इ) केंद्रसंचालक अथवा पर्यवेक्षकाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन न करणे अथवा अन्य गैरप्रकार करणे,
  16. उत्तरपत्रिकेत / पुरवणीत प्रक्षोभक / असांविधानिक भाषेचा वापर, शिवीगाळ लिहिणे किंवा धमक्या देणे, बैठक क्रमांक / फोन नंबर / भ्रमणध्वनी क्रमांक देऊन संपर्क साधण्यास सुचविणे / विनंती करणे याद्वारे स्वतःची ओळख देणे, विषयाशी संबंधित नसलेला अन्य मजकूर लिहिणे (चुकीची उत्तरे वगळून) तसेच कोणत्याही प्रकाराने ओळख देणे (उदा., विशिष्ट खूण करणे, चिन्ह काढणे नांव, पत्ता लिहिणे, शाळेचे / केंद्राचे / गावाचे नांव, अथवा अन्य कोणत्याही प्रकारे ओळख पटविणारी बाब ) इत्यादी कृती केल्यास अशा परीक्षार्थ्याची चौकशी करून संबंधित विषयाची संपादणूक रद्द करण्यात येईल
  17. परीक्षा सुरू झाल्यांतर परीक्षा संपेपर्यंत परीक्षार्थ्यास परीक्षागृहाबाहेर जाता येणार नाही. पण अपवादात्मक परिस्थितीत पर्यवेक्षकाच्या परवानगीनुसार जाता येऊ शकते.
  18. प्रत्येक पेपर संपण्यापूर्वी १० मिनिटे अगोदर इशारा घंटा होईल, त्यानंतर विद्यार्थ्याने उत्तरपत्रिका व पुरवण्यांवर काळ्या रंगाचा होलोक्राफ्ट स्टिकर सेक्शन प्रत्येकी एक या प्रमाणे दिलेल्या जागेवरच बरोबर चिकटवावा. प्रत्येक पेपरच्या शेवटी अंतिम घंटा होईल. अंतिम घंटा होताच उत्तरे लिहिणे थांबवावे आणि मूळ उत्तरपत्रिका व पुरवण्या बरोबर बांधल्याची खात्री करावी. त्याचप्रमाणे मुखपृष्ठावर एकूण पुरवण्यांची नोंद करण्यात यावी आणि पर्यवेक्षकाने सर्व उत्तरपत्रिका गोळा करेपर्यत परीक्षार्थ्यांनी आपले आसन सोडू नये.
  19. परीक्षर्थ्यांच्या प्रवेशपत्राचा / ओळखपत्राचा दुरुपयोग जो कोणी परीक्षा काळात करील त्याचे व संबंधित विद्यार्थ्याचे वर्तन अजामीनपात्र व दखलपात्र गुन्हा आहे. दोन्ही संबंधिताविरुध्द नियमानुसार कारवाई केली जाईल.
  20. उत्तरपत्रिकेत स्केचपेनचा वापर करता येणार नाही. आकृत्यांसाठी साध्या पेन्सिलचा वापर करावा. भाषा विषय कृतिपत्रिकामध्ये आकृत्यांसाठी पेनचा वापर करावा.
  21. परीक्षार्थ्यांना परीक्षागृहात मोबाईल, इलेक्ट्रॉनिक घड्याळ, Pocket Calculator वा तत्सम इलेक्ट्रॉनिक्स् उपकरणांचा वापर करता येणार नाही.
  22. मंडळाने दिलेली अधिकृत लॉग टेबल वापरावे व पेपर संपल्यानंतर परत करावे.

No comments:

Post a Comment