ईगतपुरी (प्रतिनिधी) काल ईगतपुरी तालुक्यातील शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणार्या भ्रष्ट मुख्याध्यापक महोदयास रंगेहाथ लाच घेताना पकडल्यानंतर दुसर्या दिवशी ईगतपुरी लगतच्या त्रंबकेश्वर तालुक्यातही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई केली असुन एका पोलीस हवालदारास तक्रारदार यांच्या तक्रारीवरुन लाच घेताना सापळा लावून रंगेहाथ पकडले आहे.

   दरम्यान लागोपाठ घडलेल्या या दोन धडक कारवाई मुळे भ्रष्ट आधिकारी तथा कर्मचारी यांचे धाबे दणाणले आहे, तर दुसरीकडे सर्वसामान्य जनतेने मात्र या धडक कारवाई चे जोरदार व उत्स्फूर्त स्वागत केले आहे.

   काल वैतारणा येथील शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापक महोदयास लाच घेतांना रंगेहाथ पकडले गेले होते. दिवसभर सर्वत्र हीच चर्चा सुरू असतानाच त्रंबकेश्वर तालुक्यातील घटनेनेही खळबळ उडवून दिली असून, पोलीस खात्याचाही भ्रष्ट व गलिच्छ कारभार या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे.

   विश्वसनीय सुत्रांकडून मिळालेली सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे, त्रंबकेश्वर शहरातील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस हवालदार मुकेश भिकचंद लोहार हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळयात रंगेहाथ सापडले आहेत.

   भावा भावाच्या झालेल्या भांडण तंटयात अन्य भावावर कारवाई करण्यासाठी पोलीस हवालदार महोदयाने लाच मागितल्याची तक्रार तक्रारदार व्यक्ती ने नोंदवली होती.

   यापोटी सबंधीत पो.हवा.लोहार यांना तक्रारदार याचेकडुन दहा हजार रुपये ची लाच स्विकारतानां रंगेहाथ पकडले गेले आहे.

   यात सापळा आधिकारी म्हणून पो.नि.भोये, बेलगावकर यांच्या नेतृत्वाखाली सह सापळा आधिकारी पो.नि. साळुंखे, सापळा पथक पो.ह.मोरे, पळशीकर, पो.ना.महाजन, देशमुख, चालक जाधव, गांगुर्डे आदींनी यशस्वी कामगिरी बजावली आहे.