Saturday, December 27, 2025

बस स्टॅन्ड व सिव्हिल हॉस्पिटल परिसरात मोबाईल चोरी, जबरी चोरी, नागरिकांना अडवून लुटणारा आरोपी पकडला.


बीड (प्रतिनिधी) शहरातील बस स्टॅन्ड व सिव्हिल हॉस्पिटल परिसरात सातत्याने मोबाईल चोरी, जबरी चोरी, नागरिकांना अडवून बळजबरी पैसे काढून घेणे, खिशातून पैसे लंपास करणे, मारहाण तसेच खून प्रयत्नासारख्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या सराईत आरोपीस बीड शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने शिताफीने अटक करून त्याच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव दीपक संतोष भोरे, रा. खडकपुरा पेठ, बीड,असे आहे.या आरोपीवर यापूर्वीही खून, मारामारी, जबरी चोरी व चोरी अशा विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.आरोपी हा विशेषतः मोबाईल चोरी करण्याच्या सवयीचा सराईत गुन्हेगार असून तो बस स्टॅन्ड व सिव्हिल हॉस्पिटलसारख्या गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी नागरिकांची गर्दी पाहून गुन्हे करत असल्याचे उघड झाले आहे.गुन्हे करून हा आरोपी नाशिक येथे पळून जाऊन तेथे वास्तव्य करत होता. गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे बीड शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने त्याचा माग काढून अटक केली आहे.या कारवाईमुळे बस स्टॅन्ड व सिव्हिल हॉस्पिटल परिसरात होणाऱ्या चोरी व जबरी चोरीच्या गुन्ह्यांना आळा बसणार असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होणार आहे.वारंवार गुन्हे करणाऱ्या अशा सराईत आरोपींवर तडीपारीसारखी कडक कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत.ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर ,उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ,पोलीस उपनिरीक्षक महेश जाधव, पो हेकॉ संदीप आघाव, मनोज जायभाय, गहिनीनाथ बावनकर, इलियास शेख, राम पवार व मंगेश शिंदे यांनी पार पाडली.

No comments:

Post a Comment