परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया दि. ०२ डिसेंबर रोजी पार पडली. तर उर्वरित मतदान दि.२० डिसेंबर रोजी होणार आहे. त्याकरिता शनिवार २१ डिसेंबर रोजी निकालाची प्रक्रिया सकाळी १० वाजेपासून सुरू होणार असून निवडणूक विभागाने त्याअनुषंगाने तयारी सुरू केली आहे. दरम्यान, मतमोजणीच्या दिवशी या ठिकाणी सर्व उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांनी सकाळी ७ वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर यांनी केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,परळी वैजनाथ नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेला अधिक पारदर्शक आणि सुरळीत बनवण्यासाठी तयार करण्यात येत आहे. निवडणुकीसाठी मतदान झाल्यावर आता मतमोजणी प्रक्रीयेसाठी नगर परिषद निवडणूक प्रशासनाची यंत्रणा सज्ज झाली आहे. परळी वैजनाथ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ करिता दिनांक ०२.१२.२०२५ रोजी मतदान संपन्न झाले, उर्वरित प्रभाग क्रमांक ३ मधील अ व ब, प्रभाग क्र. ९ अ व प्रभाग क्रमांक १४ ब या जागे करिता दिनांक २०.१२.२०२५ रोजी मतदान होणार आहे. यासाठी मतमोजणी दिनांक २१.१२ .२०२५ रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार आहे. या करिता ९ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. एका टेबलासाठी ४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याकरिता मुख्य २ फेऱ्या होणार आहेत. पहिल्या फेरीमध्ये प्रभाग क्रमांक १ ते प्रभाग क्रमांक ९ तर दुसऱ्या फेरी मध्ये प्रभाग क्रमांक १० ते प्रभाग क्रमांक १७ ची मतमोजणी होणार आहे. टपाली मतमोजणी त्याच प्रभागातील त्याच टेबलवर होणार आहे. प्रत्येक टेबलवर त्या प्रभागातील सर्व मतदान केंद्रांची मतमोजणी होणार आहे.
याकरिता मतमोजणीसाठी उमेदवार किंवा मतमोजणी प्रतिनिधी कोणीही एकच उपस्थित राहू शकणार आहेत. तर नगराध्यक्ष पदासाठी नऊ टेबलाकरिता एक प्रतिनिधी याप्रमाणे उपस्थित राहणार आहेत. मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल आणण्यास बंदी आहे. प्रत्येक उमेदवार व प्रतिनिधींची मेटल डिटेक्टर द्वारे तपासणी करूनच मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी मतमोजणी करिता सोडण्यात येणार आहे. मतमोजणी केंद्रावर प्रवेश करतेवेळी आपले ओळखपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे. ओळखपत्र नसल्यास आपणास मतमोजणी कक्षात प्रवेश मिळणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. मतमोजणी केंद्रावर शांततेचा भंग होऊ नये व कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेतली आहे.
परळी वैजनाथ नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडली. मतदान झाल्यानंतर सर्व ईव्हीएम मशीन स्ट्रांग रूममध्ये कडेकोट बंदोबस्तात सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. स्ट्रॉग रूमच्या सुरक्षेसाठी पोलिस तैनात आहेत. स्ट्रॉग रूम सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आहेत. आता २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे उमेदवार आणि मतदारांचे लक्ष लागून आहे. मतदान सुरळीतपणे पार पडल्यानंतर, आता मतमोजणी सुरळीतपणे पार पडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी व नगर परिषद कडून चोख नियोजन केले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस बंदोबस्तासाठी तैनात रहाणार आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment