परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदावर लिंगायत समाजाला थेट आणि ठोस न्याय देत समाजातील अनुभवी, संघटनात्मक व सर्वसमावेशक नेतृत्व असलेले श्री. योगेश विजयकुमार मेनकुदळे यांचीच नियुक्ती करावी, अशी ठाम, स्पष्ट व अपेक्षापूर्ण मागणी मी शिवकुमार केदारी (उपाध्यक्ष, वीरशैव विकास प्रतिष्ठान, परळी वैजनाथ) माझ्या वतीने करीत आहे.
परळी शहरात लिंगायत समाजाची लोकसंख्या सुमारे २० ते २५ हजार मतदारांची आहे. हा समाज गेली अनेक दशके मा. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे व मा. धनंजय मुंडे साहेब यांच्या पाठीशी कोणतीही अट न ठेवता, कोणताही लाभ न पाहता निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि ठामपणे उभा राहिला आहे. नगरपरिषद, विधानसभा, लोकसभा तसेच विविध संस्थात्मक निवडणुकांमध्ये लिंगायत समाजाने नेहमीच मुंडे घराण्याच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली आहे.
असे असताना नुकत्याच पार पडलेल्या परळी नगरपरिषद निवडणुकीत लिंगायत समाजाला केवळ तीन उमेदवारांची संधी देण्यात आली, त्यापैकी दोन नगरसेवक निवडून आले. ही बाब समाजाच्या ताकदीचे व विश्वासार्हतेचे स्पष्ट द्योतक आहे. त्यामुळे उपनगराध्यक्ष पदावर लिंगायत समाजाला प्रतिनिधित्व न देणे हे अन्यायकारक, दुर्लक्ष करणारे आणि असंतुलित ठरेल, हे स्पष्टपणे सांगावे लागेल.
योगेश मेनकुदळे हे केवळ उमेदवार नाहीत, तर परळीच्या राजकारणात खोल मुळे असलेले नेतृत्व आहेत. त्यांचे आजोबा स्व. श्री. गुरुलिंग आप्पा मेनकुदळे यांनी १३ वर्षे परळी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष म्हणून भरीव विकासाचा ठसा उमटवला. त्यांच्या कार्यकाळातील रस्ते व नागरी सुविधा आजही परळीकरांच्या आठवणीत आहेत. तसेच त्यांचे वडील श्री. विजयकुमार गुरुलिंग आप्पा मेनकुदळे यांनी १० वर्षे नगरसेवक व सभापती म्हणून नगरपरिषदेत प्रभावी व अभ्यासपूर्ण काम केले आहे.
यासोबतच योगेश मेनकुदळे यांचा संघटनात्मक अनुभव अत्यंत भक्कम आहे. त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे परळी शहर अध्यक्षपद तब्बल १५ वर्षे भूषवले. एवढा दीर्घकाळ एखाद्या जबाबदारीवर काम करणे ही त्यांच्या कार्यक्षमता, विश्वासार्हता व नेतृत्वक्षमतेची पावती आहे. युवक संघटन, जनआंदोलन, सामाजिक उपक्रम व पक्षवाढ यामध्ये त्यांचे योगदान सर्वश्रुत आहे.
योगेश मेनकुदळे हे सर्व समाज घटकांशी संपर्कात असलेले, समन्वय साधणारे व सामाजिकदृष्ट्या सक्रिय नेतृत्व आहे. वीरशैव-लिंगायत वधू-वर परिचय मेळावे, सामूहिक विवाह सोहळे, वीरशैव श्मशानभूमी विषयक प्रश्न तसेच विविध सामाजिक कार्यांमध्ये त्यांचा सहभाग सातत्याने राहिला आहे. त्यामुळे ते केवळ लिंगायत समाजाचेच नव्हे, तर संपूर्ण परळी शहराचे प्रतिनिधित्व करू शकतात.
लिंगायत समाजाचा मुंडे घराण्याशी असलेला विश्वास स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या काळापासून अखंड राहिला आहे. हा समाज कधीही दगा देणारा नाही, मात्र सातत्याने दुर्लक्ष झाले तर समाजात तीव्र अस्वस्थता निर्माण होऊ शकते, हे वास्तव नाकारता येणार नाही.
तरी मा. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे व मा. धनंजय मुंडे साहेब यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, लिंगायत समाजाच्या भावना व योगदानाचा सन्मान राखत, परळी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदावर योगेश विजयकुमार मेनकुदळे यांचीच निवड करावी, ही मी माझ्या वतीने अत्यंत ठाम शब्दांत मागणी करीत आहे.
— शिवकुमार केदारी
उपाध्यक्ष, वीरशैव विकास प्रतिष्ठान, परळी वैजनाथ
No comments:
Post a Comment