Saturday, July 13, 2024

इंग्रजीच्या शिक्षकांनाच इंग्रजी येईना !विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ करताहेत 'हे' शिक्षक.

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांतील इंग्रजी विषयाच्या अनेक शिक्षकांना इंग्रजी बोलता येत नाही. याची प्रचिती गुरुवारी (ता. ११) उपसंचालक अनिल साबळे यांना आली. उपसंचालकांनी विचारलेल्या ‘टीचिंग टेक्निक मेथड काय आहे?’ हेही या शिक्षकांना सांगता आले नाही. शिवाय त्यांनी इंग्रजीतून विचारलेल्या प्रश्नांना काही शिक्षकांनी मराठीतून उत्तरे दिली, तीही चुकीची. त्यामुळे हे शिक्षक विद्यार्थ्यांना इंग्रजीचे काय धडे देत असतील, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील काही शिक्षक संचमान्यता दुरुस्ती, पदोन्नती, पदावनत प्रक्रियेसाठी महाविद्यालयीन कामानिमित्त गुरुवारी उपसंचालक कार्यालयात आले होते. महाविद्यालयाबाबत विचारपूस करताना उपसंचालक साबळे यांनी त्यांना कोणत्या विषयाचे शिक्षक आहेत, असे विचारले. त्यावर काहींनी ‘आम्ही इंग्रजी विषय विद्यार्थ्यांना शिकवतो’, असे सांगितले.

त्यावर साबळे यांनी या इंग्रजी विषय शिकवणाऱ्या प्राध्यापकांना ‘अध्यापन पद्धत तंत्राची व्याख्या काय आहे?’ त्यानंतर ‘अध्यापनास्त्र म्हणजे काय? असे प्रश्न विचारले. त्यावर प्रत्येक इंग्रजी विषयाचे शिक्षक एकमेकांकडे पाहू लागले. कोणालाच उत्तर देता आले नाही. म्हणजे बालमानसशास्त्र, असे एका प्राध्यापकाने उत्तर दिले. त्यांच्या या उत्तराने उपसंचालकांनाही आश्चर्य वाटले. इंग्रजीच्या शिक्षक, प्राध्यापकांनाच इंग्रजी येत नसेल, तेथे मुलांना काय शिकवणार? अशीच अवस्था बहुतांश कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक, प्राध्यापकांची आहे.

गुणवत्ता अभियानाला संस्थाचालकांचा विरोध

पूर्वी शिक्षण विभागाकडून शैक्षणिक गुणवत्ता अभियान राबविण्यात येत होते. त्यामध्ये शासकीयसह खासगी अनुदानित शाळा, महाविद्यालयांचीही शैक्षणिक गुणवत्ता तपासण्यात येत होती. त्यामुळे अनेक संस्थाचालकांनी या अभियानाला विरोध करून ही तपासणी बंद पाडली होती. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांत गुणवत्ताधारक प्राध्यापक, शिक्षकांचा तुटवडा आहे. शिक्षण विभागाने याकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता असल्याचे शिक्षणतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

काही अपवाद

कनिष्ठ महाविद्यालयातील इंग्रजीच्या काही शिक्षकांना इंग्रजी बोलता येत नाही, हे यातून दिसून आले. पण, अनेक शिक्षक याला अपवादही आहेत. नेमके ते शिक्षक यावेळी उपसंचालक कार्यालयात नव्हते. पण, जे होते त्यांच्यामुळे गुणवत्ता असलेल्या अशा शिक्षकांचीही बदनामी होत आहे.

कोणत्या मेरिटवर नियुक्ती?

जिल्ह्यातील बहुतांश कनिष्ठ महाविद्यालये ही अनुदानित आहेत. तेथे शिक्षकांची नियुक्ती संस्थाचालकांच्या मर्जीनुसार चालते. जो जास्त पैसे देईल, त्याला प्राधान्य दिले जाते. त्याला काय शिकवता येते, त्याच्यामध्ये किती बुद्धिमत्ता आहे, याकडे दुर्लक्ष केले जाते.

विभागातून शाळा, संस्थांसह वैयक्तिक कामांसाठी अनेक शिक्षक, प्राध्यापक येतात. त्यांना त्यांच्या विशेष विषयावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत. इंग्रजी विषयाचा प्राध्यापक विचारलेल्या प्रश्नाला मराठीत उत्तर देत असेल तर संस्थेने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

— अनिल साबळे, शिक्षण उपसंचालक.


No comments:

Post a Comment