Wednesday, January 24, 2024

पतीच्या रोजच्या त्रासाला कंटाळून पत्नीने उचलले टोकाचे पाऊल.गळफास घेवून केली आत्महत्या.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) कोणताही कामधंदा न करता दारू पिऊन त्रास देणाऱ्या नवऱ्याला कंटाळून विवाहितेने घरातील लोखंडाच्या आडुस दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना 22 जानेवारी रोजी  सकाळी  परळी तालुक्यातील  तळेगाव येथे   घडली. शिल्पा कृष्णा हजारे ( रा .तळेगाव. ता. परळी) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

या प्रकरणी मृत शिल्पाचा भाऊ महादू विठ्ठल कांबळे ( रा . मरळवाडी) यांनी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. त्यावरून सोमवारी रात्री शिल्पाचा नवरा कृष्णा भगवान हजारे व दिर,सासू ,सासऱ्या विरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

पोलिसांतील तक्रारीनुसार, शिल्पाचा विवाह २०१३ मध्ये तळेगाव येथील कृष्णा भगवान हजारे यांच्या सोबत झाला. लग्नानंतर दोन वर्ष शिल्पाला सासरी चांगले नांदविले त्यानंतर मात्र काही दिवसांनी  त्रास सुरू झाला.तिचा नवरा कृष्णा कामधंदा करीत नसून रोज दारू पिऊन घरी येत असे. घरात काही सामान आणण्यास सांगितले तर मारहाण करत असे, अशी माहिती शिल्पाने आई,वडील,बहिण यांना दिली होती. नवऱ्याच्या त्रासास कंटाळून  22 जानेवारी रोजी शिल्पाने गळफास घेऊन जीवन संपवले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश झांबरे करीत आहेत.

No comments:

Post a Comment