बीड (प्रतिनिधी ) जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर बीड शहरातील ऐतिहासिक ग्रामदैवत असलेल्या श्रीक्षेत्र कंकालेश्वर मंदिरात सोमवार दिनांक 7 मार्च रोजी सकाळी 11.35 वाजता किन्नर सपना आणि तिचा प्रेमवीर बाळू यांचा अनोखा विवाह सोहळा धार्मिक विधीनुसार संपन्न होणार आहे. या विवाह सोहळ्याची जबाबदारी करणी सेनेच्या महिला प्रदेशाध्यक्ष संध्या राजपूत आणि त्यांच्या टीमने स्वीकारली आहे .या विवाह सोहळ्याला प्रतिष्ठित नागरिकांनी उपस्थित राहून हा अनोखा विवाह सोहळा ऐतिहासिक करावा असे आवाहन करणी महिला सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
विवाहाच्या पार्श्वभूमीवर रितीरिवाजानुसार नवरदेव बाळूला हळद लावण्याचा कार्यक्रम गुरुवार दिनांक 3 मार्च रोजी रात्री पार पडला 5 दिवस नवरदेवाला हळद लावण्यात येणार असून रविवार दिनांक 6 मार्च रोजी किन्नर सपना यांच्या राहत्या घरी हळदीचा अनोखा कार्यक्रम देखील करण्यात येणार आहे.
नैसर्गिक दृष्ट्या ज्यांच्या पदरी धड पुरुषत्व आलेले नाही किंवा पूर्ण स्त्रीत्व लाभलेल नाही अशा तृतीयपंथी किन्नर महिला आज देखील कायम उपेक्षित आहेत. त्यांच्या प्रश्नांना शासन आणि प्रशासन स्तरावर न्याय मिळावा या हेतूने दैनिक समर्थ राजयोगचे संपादक वैभव स्वामी, बीड संचारच्या संपादिका प्रतिभा गणोरकर, दैनिक सूर्योदयच्या पत्रकार शेख आयेशा यांनी पुढाकार घेऊन केलेल्या मदतीच्या आव्हानाला करणी महिला सेनेच्या प्रदेशाध्यक्षा संध्या राजपूत यांनी पुढाकार घेऊन किन्नर सपना आणि बाळू यांच्या विवाहाची सर्वस्वी जबाबदारी स्वीकारली आहे. किन्नर सपना वधूला सोन्याचे मनी मंगळसूत्र, चांदीचे जोडवे यांची जबाबदारी टीव्ही नाईनचे जिल्हा प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर यांच्या पुढाकारातून भाजपा भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सतीश भोसले यांनी मदतीचे हात पुढे केले आहेत. पायातील चैन बीड संचारच्या संपादिका प्रतिभा गणोरकर यांनी देण्याचे जाहीर केले आहे. संसार उपयोगी साहित्य बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवेंद्र शेटे यांनी देण्याचे जाहीर केले आहे. या सर्व दानशूरांचे जगदविवेक प्रतिष्ठानच्यावतीने आभार मानण्यात आले असून या विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन करणी महिला सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
विवाहाची जबाबदारी करणी महिला सेनेने उचलली
बीडमध्ये सपना नामक एक किन्नर महिला बाळू नामक युवकासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे.त्यांना कायदेशीर विवाह करायचा आहे, मात्र प्रशासकीय अडचणी मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. त्याच बरोबर समाजातून प्रचंड विरोध होत आहे. त्याला न जुमानता हे जोडपे संघर्ष करत आहे.त्यांना न्याय हक्क देण्यासाठी पत्रकार वैभव स्वामी, प्रतिभा गणोरकर आणि शेख आयेशा यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या पाठीशी करणी महिला सेना खंबीरपणे पाठीशी उभी राहून हा विवाह सोहळा लावून देण्याची खर्चासह जबाबदारी स्वीकारली आहे. करनी महिला सेनेच्या प्रदेशाध्यक्षा संध्या राजपूत आणि त्यांच्या सहकारी प्रीत कुकडेजा, शितल धोंडरे, शीतल राजपूत यांनी स्वीकारून हे अनोखे कन्यादान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना अधिकृत विवाह बंधनाचा कायदेशीर हक्क देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील जाहीर केले आहे.
विवाह आमच्या इच्छे नुसारच - सपना, बाळू
बीड जिल्ह्यात किंबहुना मराठवाड्यामध्ये किन्नर महिले समवेत होत असलेला हा पहीला कदाचित विवाह आहे. हा विवाह बाळू आणि सपना या दोघांच्या प्रेमातून स्व इच्छेने होत आहे. हा विवाह कोणाच्याही सांगण्यावरून होत नसल्याने या विवाहाला कोणीही विरोध न करता शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन नववधू किन्नर सपना आणि नव वर बाळू यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment