Sunday, March 20, 2022
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुक शिवशक्ती सेनेच्या करुणा शर्मा निवडणूक लढविणार....
कोल्हापूर (प्रतिनिधी) कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली असून कोल्हापूर उत्तरची ही जागा काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झाली आहे. या पोटनिवडणुकीसाठी रंगत येत असून या रणांगणात आता करुणा शर्मा यांनी देखील उडी घेतली आहे.
या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 12 एप्रिल रोजी यासाठी मतदान होणार असून 16 एप्रिलला मतमोजणी होणार आहे. आता निवडणुकीच्या रिंगणात धनंजय मुंडेंवर केलेल्या आरोपांनंतर चर्चेत आलेल्या करुणा शर्मा उतरणार आहेत. त्या आगामी कोल्हापूर पोटनिवडणुकीत शिवशक्ती सेनेच्या अधिकृत उमेदवार असतील.
हा पक्ष करुणा शर्मा यांनीच स्थापन केलेला आहे. गेले काही दिवस पक्षातर्फे कोण उमेदवार असेल यावर मंथन झाले आणि अखेरीस करुणा शर्मा यांनी स्वतःच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष स्थापनेनंतर थेट विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उतरल्यामुळे करुणा शर्मा यांची आणि त्यांच्या पक्षाचीही चर्चा होत आहे.
दरम्यान सत्यजित कदम यांचे नाव कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून जवळपास निश्चित झाले आहे. नाना कदम हे गेल्या दहा वर्षापासून कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक आहेत. सत्यजित कदम यांनी 2014मध्ये काँग्रेसकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती. सत्यजित कदम हे माजी खासदार धनंजय महाडिक यांचे नातेवाईक आहेत.
ही निवडणूक बिनविरोध होईल असे सुरुवातीला वाटले होते, पण सगळेच पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत. दोन टर्म आमदार राहिलेल्या शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांचा पराभव करुन काँग्रेसचे चंद्रकांत जाधव आमदार झाले होते.
पण आमदारकी मिळाल्यानंतर अवघ्या दोन वर्षातच त्यांचे निधन झाल्यामुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघात पुन्हा एकदा निवडणूक लागली आहे. काँग्रेसकडून जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांची उमेदवारी जवळपास निश्चित केली आहे. तशा पद्धतीने तयारी देखील सुरु आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment