औरंगाबाद: (प्रतिनिधी) काम करूनही नोकराला पगार न देणं मालकाला चांगलंच महागात पडले आहे. कारण पगाराचे पैसे न दिल्याच्या कारणावरून धावत्या कारमध्ये वाद होताच नोकराने दुकानदारावर चाकूने हल्ला चढवला. तर याचदरम्यान अचानक ब्रेक दाबल्यामुळे पाठीमागून आलेल्या वाहनाने कारला धडक दिली.
ही घटना शहरातील जालना रोडवरील चुल हॉटेलजवळ घडला. याप्रकरणी हल्लेखोर नोकराला पोलिसांनी अटक केली आहे.
अधिक माहिती अशी की, अजय दिलीप नागरे (२२, रा. सह्याद्री बिल्डींग, शिवाजीनगर) यांचे करमाड येथे अमित गारमेंट नावाचे दुकान आहे. तर दोन महिन्यांपूर्वी नितेश शिवाजी आवारे (२२, रा. कोरघळ) हा त्यांच्याकडे सेल्समन म्हणून कामाला लागला होता. दरम्यान नागरे आणि आवारे असे दोघेही कारने औरंगाबादच्या दिशेने येत होते. त्यावेळी दोघांच्या धावत्या कारमध्ये पगाराच्या पैशावरुन वाद झाला. या वादातून नितेश आवारे याने नागरेवर चाकूने वार केला.
वाद सुरू असताना अचानक झालेला चाकूचा पहिला वार नागरेने वाचविला. आवारे हल्ला करत असल्याचे पाहून नागरेने अचानक कारचे ब्रेक दाबले. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या कारची नागरेच्या कारला धडक बसली. कारला धडक बसल्याचा मोठा आवाज झाल्यामुळे नागरे त्यांच्या बाजूच्या दरवाजाने कारखाली उतरले तर बाजूच्या दाराने हल्ला करणारा आवारे सुद्धा पसार झाला.
*मालकाकडून पैसे देण्यास टाळाटाळ…
नागरे यांच्या दुकानात दोन महिने काम केल्यानंतर सुद्धा आवारे याला पगार मिळत नसल्याने तो प्रचंड संतापला होता.
*अनेकदा पैशांची मागणी करुनही टाळाटाळ होत असल्याचा राग त्याच्या डोक्यात होता. त्यामुळे त्याने नागरे कारमध्ये एकटाच असल्याचे पाहून नागरे यांच्यावर चाकुहल्ला चढवला. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment