Wednesday, March 2, 2022

परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उभारण्यास मंजुरी.



परभणी : गेल्या अनेक वर्षांपासूनची परभणीकरांच्या हक्काची मागणी असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास राज्य शासनाने बुधवारी (ता.दोन) अखेर मंजुरी दिली आहे. परभणीकरांच्या जनआंदोलनाचे हे मोठे यश मानले जात आहे. परभणी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे. यासाठी परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली दोन वेगवेगळ्या टप्प्यात जनआंदोलन करण्यात आले होते. सुरुवातीच्या टप्प्यात सर्वसामान्य नागरीक, विद्यार्थी, महिला, डॉक्टर, वकील यांनी खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो विद्यार्थांचा मोर्चा ही काढण्यात आला होता. त्यानंतर खासदार संजय जाधव यांच्या मुख्य नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेत्यांनी सलग आठ दिवस धरणे आंदोलन केले होते. आंदोलन सुरु असतांनाच राज्य सरकारने पीपीपी धोरणाची घोषणा केली होती. त्यामुळे परभणीकरांमध्ये संभ्रामावस्था निर्माण झाली होती. त्यामुळे खासदार संजय जाधव यांनी प्राणांतिक उपोषणाचा ईशारा दिला होता. परंतू, त्याच वेळी ता. १ मे रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मराठवाडा दौऱ्यावर असतांना परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा केली होती. त्यामुळे परत परभणीकरांच्या आशा उंचावल्या होत्या. त्यानंतर शासकीयस्तरावरून मोठ्या प्रमाणात हालचाली झाल्या. एका उच्चस्तरीय समितीनेही शासकीय रुग्णालयाच्या उभारणी संदर्भात परभणी येथे भेट देवून पाहणी केली होती. अखेर बुधवारी (ता.दोन) परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी देण्याच निर्णय राज्य शासनाने जाहीर केला.

परभणीकर संघर्ष समितीचेही मोठे योगदानपरभणीकर संघर्ष समितीच्या वतीने ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी खासदार डॉ. फौजिया खान व माजी आमदार अॅड. विजयराव गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली वारंवार राज्यातील ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी पाठपुरावा केला होता. ज्येष्ठ नेते शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या भेटी घेऊन जोर वाढविला होता. त्याचाही सकारात्मक परिणाम झाला आहे. सर्व परभणीकरांच्या मागणीला यश आले आहे. हा जनआंदोलनाचा विजय आहे. राज्याचे मुख्यमंत्री तथा आमचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आता परभणीकरांना उत्तम आरोग्य सेवा पुरविल्या जातील.- संजय जाधव, खासदार, परभणी.

No comments:

Post a Comment