बीड (प्रतिनिधी) - एकीकडे राज्य शासनाने राज्यातील किराणा दुकानांवर वाईन विकण्यास परवानगी दिली आहे तर दुसरीकडे मात्र सार्वजनिक आरोग्य विभाग प्रशासनाने शहरातील लहान-लहान पान टपऱ्यांवर धाड टाकण्याचा सपाटा लावला असून पान टपरी चालकांना २०० ते ६०० रुपयांपर्यंत दंड आकारत सुटले आहे. यामुळे पान टपरी चालकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून एका टपरी चालकाने तर पथकाची धास्ती घेत सिगारेट, विडी, तंबाखू पुडी व तत्सम तंबाखूजन्य पदार्थ विकणे बंद करून त्याऐवजी सुट्टे पान आणि कुरडाया व पापड विकणे सुरू केले आहे. असे या कारवाई बाबत माहिती घेणारे मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
शासन असो की प्रशासन असो त्यांच्याकडून कधी कोणता निर्णय घेतला जाईल, कधी कोणती अंमलबजावणी सुरु केली जाईल व कोणती बंद केली जाईल, हे भल्याभल्यांना सांगता येत नाही. अशाच प्रकारे काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने किराणा दुकानांवर वाईन विकण्यास मंजुरी दिली. मात्र त्यास समाजामधून तीव्र विरोध होत आहे. यामुळे किराणा दुकानावर वाईन पुढे चालून जॉईन होईल की, समाज या निर्णयाला नॉट फाईन म्हणून हाणून पाडेल. हे येणाऱ्या काळात दिसेलच.
परंतु बीड शहरात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पथकाने छोट्या-छोट्या पान टपऱ्यांवर सिगारेट, विडी, तंबाखू पुडी व अन्य तंबाखूजन्य पदार्थ विकू नये म्हणून पान टपऱ्यांवर सरसकट धाडी टाकण्यास सुरुवात केली असून दंड आकारत वसूली केली जात आहे. यामुळे टपरी चालकांची पाचावर धारण झाली आहे. अगोदरच गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट आहे. त्यात आता काही प्रमाणात उद्योग व्यवसाय कसेतरी सुरू झाले. आता कुठे व्यावसायिकांचा गाडा हळूहळू मार्गी लागण्यास सुरुवात होत नाही तोच अशाप्रकारे धाडी टाकण्यात येत असल्याने पान टपरी चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. यादोन्ही प्रसंगावरून शासन-प्रशासनाची अजब तऱ्हा पुन्हा एकदा दिसून येत आहे. असे मुक्त पत्रकार एस.एम.युसूफ़ यांनी या अवस्थेवर दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
चौकट -
*दंडाची पावती सदोष !*
महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग असे नाव मुद्रित केलेली पावती पथकाकडून टपरी चालकाला दंडाची रक्कम आकारत दिली गेली व दंडाची रक्कम वसूल करण्यात आली. मात्र त्या पावतीवर ना टपरीचे, ना टपरीच्या मालकाचे नाव टाकले. ना पत्ता लिहिण्यात आला. शिवाय दंडित करणाऱ्या अधिकार्याचे नाव व पदाचे नावही लिहिलेले नाही. तसेच संबंधित विभागाचा शिक्काही पावती वर नाही. फक्त जिल्हा तंबाखू नियंत्रण पथक, कारंजा, बीड, दिनांक, व दंडाची रक्कम आणि दंड वसूल करणाऱ्यांची सही एवढ्याच बाबी पावतीवर नमूद आहे. अशाप्रकारे सदोष पावती असल्याने ही पावती देऊन वसूल करण्यात येणारी दंडाची रक्कम ही शासनाकडे जमा होईल की, आणखीन कुठे जाईल ? अशी शंकाही व्यक्त केली जात आहे.
चौकट -
*कुरडाया व पापड विकतोय !*
जवळपासच्या टपरी चालकांना प्रत्येकी २०० ते ६०० रुपयांचा दंड देण्यात आल्याने एका टपरी चालकाने तंबाखू व तंबाखूजन्य अन्य वस्तू टपरीतून हद्दपार करत फक्त सुट्टे पान व कुरडाया, पापड विकण्यास सुरुवात केली. याबद्दल त्याला बोलते केले असता त्याने म्हटले की, अगोदरच कोरोना च्या धोरणामुळे सगळे धंदे बसले आहेत. दोन चारशे रुपये कमवायला दोन-दोन, चार-चार दिवस लागायलेत. अशा अवस्थेमध्ये हे तंबाखू नियंत्रण पथक येऊन २०० ते ६०० रुपयांपर्यंत दंड आकारू लागले तर आम्ही जेमतेम कमविणाऱ्यांनी दंडाची रक्कम भरावी की घर प्रपंच चालविण्यासाठी घरी दोन पैसे घेऊन जावे ? हा विचार करून सिगारेट, विडी, तंबाखू पुडी व तंबाखूजन्य अन्य वस्तू विकणे बंद करून घरी तयार केलेले कुरडया व पापड विकू लागलो असे म्हटले.
No comments:
Post a Comment