नागपूर (प्रतिनीधी ) नागपूरच्या बुट्टीबोरी याठिकाणी कोविड रुग्णाचा मृतदेह कचरा गाडीतून नेण्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. बुट्टीबोरी नगरपरिषदेकडे रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यानं त्यांनी कोविड रुग्णाचा मृतदेह नेण्यासाठी कचरा गाडीचा वापर केला आहे.13 मे रोजी जयराम नेवारे या कोरोना बाधित रुग्णाचा मृतदेह कचरा गाडीतून नेण्यात आला होता. यानंतर स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या या गलथान कारभारावर आक्षेप घेतला आहे. आक्षेप नोंदवल्यानंतरही बुट्टीबोरी नगरपालिकेनं कचरा गाडीतून मृतदेहांची वाहतूक सुरूच ठेवली आहे.
यावेळी मात्र नागरिकांनी आणि नातेवाईकांनी नगरपरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्यांनी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत स्थानिकांनी नगरपरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी नगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र चिकळगुंडे यांनी नागरिकांची आणि पीडित परिवाराची माफी मागितली आहे. त्याचबरोबर येथून पुढे असं होणार नाही, असं अश्वासनही दिलं आहे. त्याचबरोबर नगरपालिकेकडे रुग्णवाहिका नसल्याची अडचणही सांगितली.

No comments:
Post a Comment