Thursday, January 14, 2021

पंकजा मुंडे राष्ट्रवादीत येणार ? जयंत पाटील म्हणतात...



मुंबई | सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली. यावरुन मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपकडून करण्यात येऊ लागली. या सर्व घडामोडींमध्ये एक नवा विषय चर्चेत आला तो म्हणजे भाजप नेत्या आणि धनंजय मुंडे यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन भाष्य केलं.

पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करण्याबाबतची चर्चा सुरु झाली आहे? त्याबाबत काय सांगाल असं जयंत पाटील यांना विचारण्यात आलं. त्यावर जयंत पाटील यांनी “माझ्यापर्यंत तर तशी कोणतीही चर्चा आलेली नाही” असं म्हणत केवळ एका ओळीत उत्तर दिलं आहे. तसेच, “धनंजय मुंडे यांच्या प्रकरणावर मी काही बोलणार नाही. त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे”.

पुढे राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला झालेल्या अटकेवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “मला वाटतं नवाब मलिक यांच्याबबात त्यांच्या जावयाने केलेली एखादी चूक असेल, केलीय की नाही ते माहिती नाही, ते चौकशीदरम्यान कळेल. पण त्यांच्या सासऱ्यावर परिणाम होण्याचं काही कारण नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे धनंजय मुंडेंच्या बाबतीत जो अर्ज त्या महिलेने केला आहे, त्याबाबत प्राथमिक माहिती घेऊन, आवश्यक त्या गोष्टी होतील. या दोन्ही प्रकरणात सरकार कोणताही हस्तक्षेप करत नाही”, असं जयंत पाटील म्हणाले.

भाजप नेते कशा भूमिका मांडतात हे सर्वांना माहिती आहे. ते राजीनामा मागू शकतात. जावयानं गुन्हा केला असेल तर त्याची चौकशी केली जाईल. सरकारी हस्तक्षेप कुठल्याही गोष्टीत‌ होत‌ नाही. सर्व सामान्य लोकांना आता‌ माहिती‌ झालं आहे. केंद्र सरकार त्यांच्या संस्था‌विरोधकांना नामोहरण करण्यासाठी वापरल्या‌ जात आहेत, असं जयंत पाटील यांनी नमूद केलं.

दरम्यान, बलात्काराच्या आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांची सध्या प्रचंड कोंडी झाली आहे. हे संपूर्ण प्रकरणच खळबळजनक असल्यामुळे सध्या प्रसारमाध्यमांकडून धनंजय मुंडे यांच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे. प्रसारमाध्यमांचा हा ससेमिरा टाळण्यासाठी धनंजय मुंडे प्रत्येक ठिकाणी जाताना विशेष खबरदारी घेत आहेत. गुरुवारी पहाटेदेखील मुंबईच्या मलबार हिल येथील चित्रकूट बंगल्यावर येताना धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांना खबर लागणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली. पहाटे अडीच-तीनच्या सुमारास धनंजय मुंडे एका खासगी गाडीतून चित्रकूट बंगल्यावर आले.

No comments:

Post a Comment