Monday, March 2, 2026

गावठी पिस्टलसह तीन तरुण गजाआड स्थानिक गुन्हे शाखा लातूर व गातेगाव पोलिसांची संयुक्त कारवाई.

                प्रतिकात्मक

​लातूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी अवैध शस्त्रांविरुद्ध सुरू केलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि गातेगाव पोलिसांनी संयुक्तरीत्या सापळा रचून मुरूड-अकोला चौक परिसरातून एका गावठी पिस्टलसह तीन संशयित तरुणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून एक मोठा संभाव्य गुन्हा टळल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
​गुप्त माहितीवरून रचला सापळा.
​२८ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास गातेगाव पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत गस्त घालत असताना, मुरूड-अकोला चौक परिसरात काही संशयित तरुण शस्त्रांसह थांबल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ कळवण्यात आले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि गातेगाव पोलिसांच्या पथकाने साखरा पाटी येथे एकत्र येत या मोहिमेचे सूक्ष्म नियोजन केले.
​पाठलाग करून आरोपींना जेरबंद केले.
​पहाटे ४.३० च्या सुमारास पोलिसांनी नियोजित ठिकाणी छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क पोलिसांनी पाठलाग करून तिघांनाही जागीच पकडले. त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांची नावे खालीलप्रमाणे निष्पन्न झाली:
​अजय गौतम लोमटे (वय २० वर्षे, रा. फुलेनगर, परळी जि. बीड)
​नयन सुधाकर वाडे (वय २६ वर्षे, रा. गंगासागर नगर, परळी वैजनाथ)
​सोमेश्वर सुभाष मिसाळ (वय २० वर्षे, रा. फुलेनगर, परळी जि. बीड)
​पिस्टल व मॅगझीन जप्त.
​मुख्य संशयित अजय लोमटे याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे ३०,००० रुपये किमतीची एक स्टीलची गावठी पिस्टल आणि मॅगझीन मिळून आले. कोणत्याही वैध परवान्याशिवाय हे शस्त्र बाळगल्याप्रकरणी गातेगाव पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे तरुण परळीहून लातूर जिल्ह्यात कोणत्या हेतूने आले होते आणि या शस्त्राचा वापर कोणावर होणार होता, याचा कसून तपास पोलीस करत आहेत.
​तपास पथकाचे कौतुक.
​ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली:
​एलसीबीचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर
​सपोनि रामदास केंद्रे (गातेगाव ठाणे)
​पोलीस उपनिरीक्षक जाधव व अमर केंद्रे
​अंमलदार संजय कांबळे, रियाज सौदागर, प्रदीप स्वामी, जमीर शेख, प्रशांत स्वामी, विजय पाटील, व्यंकटेश निटूरे आणि आयुब शेख यांच्या पथकाने केली.

No comments:

Post a Comment