परांडा (प्रतिनिधी) : सोलापूर-पुणे महामार्गावर गुरुवारी मध्यरात्री एक भीषण अपघाताची घटना घडली. धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या फॉर्च्युनर कारला एका भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा काही भाग चक्काचूर झाला आहे. सुदैवाने सावंतांसह त्यांचे सहकारी व अंगरक्षक यात सुखरूप बचावले आहेत.
मुंबई येथे बुधवारी दुपारी भाजप प्रेवेश सोहळा झाल्यानंतर माजी माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य धनंजय सावंत आपल्या फॉर्च्युनर ( एमएच.१२- एसइ. ५५५९) गाडीने परंड्याकडे रवाना झाले होते. ते गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास भिगवणजवळील डाळज गावाच्या हद्दीत आले असता, समोरून येणाऱ्या कंटेनरने ( एमएच. १२- डब्ल्यूजे. ६३७४) त्यांच्या वाहनाला भीषण धडक दिली. धडक इतकी जोरात होती की आलिशान फॉर्च्युनरच्या चालकाच्या बाजूचा पूर्ण भाग चक्काचूर झाला आहे. दरम्यान, सुदैवाने या भीषण अपघात धनंजय सावंत यांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. गाडीचा चालक आणि सुरक्षारक्षक किरकोळ जखमी झाले असून, त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. "कार्यकर्त्यांचे प्रेम, शुभेच्छा आणि ईश्वराची कृपा यामुळेच मी आज या भीषण संकटातून सुखरूप बाहेर आलो आहे. थोड्या किरकोळ जखमा झाल्या असल्या तरी प्रकृती स्थिर आहे, कुणीही काळजी करू नये.- धनंजय सावंत, माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद.
No comments:
Post a Comment