केज (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी(शरद पवार)ला मोठा धक्का बसला आहे. शरद पवार गटाच्या प्रदेश उपाध्यक्ष आणि केज विधानसभेच्या माजी आमदार प्रा. संगीता ठोंबरे यांनी आपल्या समर्थकांसह आज(दि.18) शिवसेना पक्ष प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत जाहीर प्रवेश केला.
या पक्षप्रवेशावेळी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हेदेखील उपस्थित होते. शिरसाटांनी ठोंबेर यांचे अभिनंदन केले व केज विधानसभेमध्ये शिवसेना पक्षाला बळकटी मिळेल, अशी आशा व्यक्त केली. यावेळी शिवसेना बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळुक, शिवसेना नेते अनिल जगताप, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, धाराशिव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना नेते अजित पिंगळे यांच्यासह शिवसेनेचे नेते व पदाधिकारी हजर होते.
आमदार ठोंबरे यांच्यासोबत डॉ. विजय प्रकाश ठोंबरे, कुंभेफळचे माजी सरपंच किशोर थोरात, भगवान सेनेचे संस्थापक अध्यक्ष विजय केंद्रे, अशोक सक्राते , अरविंद चाळक, उमेश चाळक यांच्यासह केज मतदार संघातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
जि.प.च्या अध्यक्षपदावर डोळा...
2014 मध्ये भाजपा तर्फे केज विधान सभेच्या आमदार राहिलेल्या संगीता ठोंबरे यांना 2019 च्या निवडणुकीत भाजपाने उमेदवारी नाकारून नमिता मुंदडा यांना दिली. त्यानंतर आमदार होण्यासाठी त्यांनी नोव्हेंबर 2024 मध्ये खासदार बजरंग सोनवणे यांच्या मध्यस्तीने राष्ट्रवादी(शरद पवार) पक्षात प्रवेश केला होता. मात्र, यावेळीही त्यांचा अपेक्षाभंग झाला. परंतु आता डोळा आगामी जि.प. निवडणुकीवर लागला आहे. यासाठीच त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्याची चर्चा केज मतदारसंघात रंगली आहे.
No comments:
Post a Comment