Wednesday, January 28, 2026

राजकारणात स्पष्टवक्तेपणाची मोठी पोकळी निर्माण झाली” - अभयकुमार ठक्कर

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) रोखठोक निर्णयक्षम व जनसामान्यांची कामे करणाऱ्या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांच्या विमान अपघाताची धक्कादायक बातमी आज सकाळी समजताच संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. राजकीय मतभेदांपलीकडे जाऊन सर्वसामान्य जनतेशी थेट संवाद साधणारा, रोखठोक स्वभावाचा आणि जे बोलेल ते करून दाखवणारा नेता आपण गमावला, अशा भावना सर्व स्तरातून व्यक्त केल्या जात आहेत.
अजितदादा पवार हे आपल्या स्पष्टवक्तेपणा, कठोर निर्णयक्षमता आणि प्रशासकीय अनुभवासाठी ओळखले जात होते. सामान्य माणसाच्या प्रश्नांवर थेट भूमिका घेऊन काम करणारा नेता म्हणून त्यांची राज्यभरात ओळख होती. सिंचन, पायाभूत सुविधा, शेती, विकासकामे यामध्ये त्यांनी घेतलेले निर्णय आजही स्मरणात राहतील, असे अनेकांनी सांगितले.
या दुःखद घटनेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने परळीचे नेते तथा माजी नगराध्यक्ष अभयकुमार ठक्कर यांनी अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी बोलताना ठक्कर म्हणाले की, “राजकारणात रोखठोक बोलणारा, निर्णयावर ठाम राहणारा आणि जनतेसाठी काम करणारा नेता म्हणून अजितदादा पवार यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.”
श्रद्धांजली अर्पण करताना त्यांनी ईश्वरचरणी दिवंगत आत्म्यास शांती लाभो तसेच पवार कुटुंबीयांना व समर्थकांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना केली. परळी शहर व परिसरातही या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत असून अनेक राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

No comments:

Post a Comment