Tuesday, January 13, 2026

जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुकांची घोषणा; 5 फेब्रुवारीला मतदान तर7 फेब्रुवारी रोजी निकाल.


मुंबई (प्रतिनिधी) राज्यातील नगरपालिका व महापालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. राज्याचे लक्ष लागून असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा आज राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आली. मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि सचिव सुरेश काकाणी यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.


या निर्णयानुसार राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी निवडणुका होणार असून 5 फेब्रुवारी रोजी मतदान होईल. तर 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. निवडणुकांची घोषणा होताच संबंधित जिल्ह्यांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
या निवडणुकांमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आदी जिल्ह्यांचा समावेश आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 16 जानेवारी ते 21 जानेवारी या कालावधीत पार पडणार आहे. निवडणूक जाहीर होताच राज्यातील ग्रामीण राजकारण तापण्याची चिन्हे दिसत असून, राजकीय पक्षांकडून तयारीला वेग आला आहे.

No comments:

Post a Comment