परभणी (प्रतिनिधी) मराठा आरक्षणाची मागणी करीत एका 35 वर्षीय युवकाने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना आज शुक्रवारी (दि.27) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. पोलीस कर्मचारी धावत गेल्यामुळे त्याला रोखण्यात यश आले असून मोठा अनर्थ टळला. नवा मोंढा पोलिसांनी युवकास ताब्यात घेतले आहे. त्या युवकाचे नाव आतिश बाबुराव गरड रा.शिवनेरी नगर, जुना पेडगाव रोड, परभणी) असे आहे.
राज्यभरात मराठा आरक्षण आंदोलन सुरू असताना, परभणीमध्ये आतिश गरड या युवकाने आरक्षणाच्या मागणीसाठी, अंगावर पेट्रोल टाकून स्वतः ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ ही घटना घडली आहे. मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावे, या मागणीसाठी त्याने हे टोकाचे पाऊल उचलले होते. परंतु वेळीच पोलीस कर्मचारी मोईन खान, शिवा काळे आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी यांनी हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. घटनेनंतर संबंधित युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याला नवा मोंढा पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आले आहे. परंतु अचानक झालेल्या या प्रकारामुळे, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गोंधळ उडाला होता. यावेळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी, तीव्र घोषणाबाजी करत सरकारचा निषेधही केला. पोलीस निरीक्षक संजय अनमुलवार यांनी त्या युवकाने पेट्रोल भरून सोबत आणलेली प्लास्टिक बाटली ताब्यात घेतली आहे.
No comments:
Post a Comment