Thursday, February 12, 2026

सिद्धेश्वर मंदिर परिसरात दिव्य ज्योति जागृती संस्थानतर्फे स्वच्छता अभियान उत्साहात.

लातूर (प्रतिनिधी) दिव्य ज्योति जागृती संस्थान, लातूर यांच्या वतीने ‘संरक्षण प्रकल्पा’अंतर्गत सिद्धेश्वर मंदिर व परिसरात बुधवार, दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी स्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले. या उपक्रमात संस्थेचे बंधू व महिला स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
सिद्धेश्वर मंदिरात दररोज मोठ्या संख्येने भाविकांची वर्दळ होत असते. त्यामुळे मंदिर परिसर स्वच्छ, सुंदर व प्रसन्न राहावा तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने संस्थेने हा उपक्रम हाती घेतला. स्वयंसेवकांनी मंदिर परिसरातील कचरा गोळा करून त्याचे ओला, सुका व अजैविक अशा प्रकारे वर्गीकरण केले आणि त्याची योग्य विल्हेवाट लावली. यासोबतच परिसरातील रस्ते, पायऱ्या आणि संपूर्ण आवार स्वच्छ करण्यात आले.या अभियानात सुमारे १०० स्वयंसेवक सहभागी झाले होते. “स्वच्छता हीच खरी सेवा” हा संदेश देत प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसराच्या स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
संस्थेच्या प्रचारक साध्वीजी व स्वामीजी यांनी सांगितले की, समाजात स्वच्छता, शिस्त व सामाजिक बांधिलकी याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी असे सामाजिक उपक्रम नियमितपणे राबविण्यात येणार आहेत.
या उपक्रमामुळे सिद्धेश्वर मंदिर परिसर स्वच्छ व प्रसन्न दिसून येत असून नागरिकांकडून या कार्याचे कौतुक केले जात आहे.

No comments:

Post a Comment